Eknath Shinde Tendernama
मुंबई

गणवेश वाटपाला तारीख पे तारीख; एकच गणवेशाला आता स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिले ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा कार्यक्रम आणि राज्य योजनेतून दोन मोफत गणवेश देण्यात येत आहेत. या गणवेशाचा दर्जा आणि रंग समान असावेत म्हणून राज्यात एक राज्य एक गणवेश योजना चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. त्यासाठी सरकारच्या खरेदी धोरणानुसार टेंडर प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.

ते म्हणाले की, दोन गणवेशापैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिलाई करुन देण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. स्काऊट व गाईड्सच्या गणवेशाचे कापड शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने गणवेशाच्या कापड खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील. हे गणवेश घालून विद्यार्थी अभिमानाने मिरवतील, असे चांगल्या दर्जाचे, उत्तम शिलाई असलेले असतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य सरकारच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्‌यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून येत्या 30 जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोहोचतील. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

केसरकर म्हणाले की, चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले. त्यानुसार कापडाची खरेदी प्रक्रिया ई टेंडर द्वारे राबविण्यात आली. त्यानंतर कापड पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली. पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या कापडापासून विद्यार्थ्यांचे गणवेष शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आले आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. विदर्भात 30 जून पासून शाळा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश विहित कालावधीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 30 जुलैपर्यंत सर्व शाळांपर्यंत हे गणवेश पोहोचतील आणि प्रथमच येत्या स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी माहितीही त्यांनी दिली.