मुंबई (Mumbai) : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण अमृत योजनेच्या माध्यमातून करण्यात येईल. नांदेड ते त्र्यंबकेश्वरपर्यंत गोदावरी नदी शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
सदस्य हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर शहराची सन 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून संपूर्ण शहरासाठी 4.5 एम.एल.डी. क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह भुयारी गटार योजनेस सरकारच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे.
उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी हर्बल फवारणी पद्धतीचा वापर याबाबतची योजना नगर विकास विभागामार्फत तयार करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य छगन भुजबळ, सरोज अहिरे यांनी सहभाग घेतला.