BMC Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिकेत कार्यकारी सहायकपदासाठी बंपर भरती; तब्बल ‘इतका’ पगार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी उमेदवारांकडून २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महापालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील २५,५००-८११०० रुपये (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान (दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.