मुंबई (Mumbai) : सिडकोने (CIDCO) ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून बांधकाम क्षेत्रात नवा विक्रम (Record) प्रस्थापित केला आहे. स्लॅब टाकण्याचा दिवसाचा सरासरी वेग १.२६ इतका आहे.
सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेंतर्गत विविध टप्प्यांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन-९६ अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बामणडोंगरी स्थानकाच्या परिसरात केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे.
याच तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३१ आणि ३७ मध्ये उभारण्यात येत असलेल्या इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण केले. त्यानंतर आता याच विभागात ५५५ दिवसांत ७०० स्लॅबचे काम पूर्ण केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. स्लॅब टाकण्याचा दिवसाचा सरासरी वेग १.२६ इतका आहे. त्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण केले होते.
यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दीष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. घरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण होण्यास मदत होईल.