CIDCO Tendernama
मुंबई

दोन वर्षात सिडकोची बल्ले बल्ले; सहाशे भूखंड विक्रीतून मालामाल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिडकोने (CIDCO) गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवी मुंबईच्या विविध नोडमधील ७० भूखंडांची विक्री योजना जाहीर केली होती. त्यातील नेरूळमधील एक भूखंड प्रतिचौरस मीटर ३ लाख १८ हजार रुपये दराने विकला गेला आहे. सिडकोने गेल्या दोन वर्षात ३० योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रफळांच्या सहाशेपेक्षा अधिक भूखंडांची विक्री केली आहे. या भूखंडांना त्यांच्या आधारभूत किमतीपेक्षा तीन ते चार पट अधिक दराचे प्रस्ताव सिडकोकडे आले आहेत.

मागील दोन वर्षांपासून सिडकोने भूखंड विक्रीचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास भूखंड विक्रीच्या ३० योजना राबविल्या आहेत. त्यातील २८ आणि २९ क्रमांकाच्या योजनेतील भूखंडांसाठी बोली लावण्याची मुदत शिल्लक आहे. तर ३० क्रमांकाच्या योजनेतील भूखंडांसाठी नुकतीच ई-बोली पूर्ण झाली. यात नेरूळ सेक्टर १३ येथील १ हजार ३९२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंडाला प्रतिचौरस मीटर ३ लाख १८ हजार ५०१ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. या भूखंडाचा सिडकोचा मूळ दर प्रतिचौरस मीटर १ लाख १७ हजार ३९३ रुपये इतका होता.

त्याचप्रमाणे नेरूळ सेक्टर १३ मधीलच २ हजार ३३८ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ३ लाख ५ हजार ९९९ रुपये प्रतिचौरस मीटर दराने विकला गेला आहे. तर नेरूळ सेक्टर २३ येथील १ हजार ४४३ चाैरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८९ हजार ८१३ रुपये प्रतिचौरस मीटर दर मिळाला आहे. त्याशिवाय या योजनेअंतर्गत विविध नोडमध्ये निवासी वापरासाठी उपलब्ध केलेल्या ४० ते १५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांनाही विक्रमी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात सिडकोने विविध नोडमध्ये वाणिज्य आणि निवासी वापराचे १४ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले होते. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत २६० कोटींची भर पडली होती. भूखंड विक्री हे सिडकोच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून सिडकोने भूखंड विक्रीचा धडका लावला आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या ३० योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रफळांच्या सहाशेपेक्षा अधिक भूखंडांची विक्री केली आहे. या भूखंडांना त्यांच्या आधारभूत किमतीपेक्षा तीन ते चार पट अधिक दराचे प्रस्ताव सिडकोला प्राप्त होत आहेत.