मुंबई (Mumbai) : 'सिडको'ने दसर्या च्या मुहूर्तावर 26 हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेत खारघरमध्ये तब्बल 3,843 घरे उपलब्ध केली आहेत. खारघरमधील हे गृहप्रकल्प रेल्वे आणि मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या घरांसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
'सिडको'ने 'सर्वांसाठी घर' या योजनेअंर्तगत नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीत 40 हजार घरांचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये खारघर रेल्वे स्थानकाशेजारी 1803, खारघर सेक्टर-14 डी-मार्ट समोर 1700 तर खारघर गांव मेट्रो स्थानक शेजारी 340 अशी एकूण 3,843 घरे सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खारघर रेल्वे स्थानकापासून 50 मीटर अंतरावर गृहनिर्माण प्रकल्पात 15 मजल्याच्या एकूण 17 इमारती असून 540 चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेली सर्व घरे टु-बीएचके प्रकाराची आहेत. विशेष म्हणजे या गृहप्रकल्पालगत खाडीकिनारा आहे. त्यामुळे थंड वातावरण तसेच इमारतीच्या छत आणि गच्चीवरून समुद्रात येणार्या भरती-ओहोटीचा आनंद घेता येणार आहे. तर खाडीच्या दुसऱ्या भागाला नवी मुंबई विमानतळ आहे. तसेच या गृहप्रकल्पाला लागून खारघर-बेलापूर कोस्टल रोड उभारला जाणार आहे.
या गृह प्रकल्पावरुन कोस्टल रोड मार्गे बेलापूर मार्गे मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सोयीचे होणार आहेत. तसेच सेक्टर- 14 बस डेपो येथे या ठिकाणी 1700 घरे असून ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत. सेक्टर-14 बस टर्मिनस लगत अल्प उत्पन्न गटासाठी 340 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील सदनिकांचे क्षेत्रफळ 322 चौरस फूट चटई असणार आहे. खारघर, सेक्टर-14 मधील गृहप्रकल्प नवी मुंबई मेट्रो मार्गातील खारघर गांव मेट्रो स्थानकालगत आहे. तसेच आजूबाजूला मार्केट परिसर आहे. एंकदरीतच खारघरमधील तीनही गृहप्रकल्प रेल्वे आणि मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नागरिकांची खारघरमधील घरांना अधिक पसंती दिसून येत आहे.