Cidco Lottery Tendernama
मुंबई

आचारसंहितेआधी सिडकोची 26 हजार घरांसाठी लॉटरी; मोक्याच्या ठिकाणांमुळे उत्सुकता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सिडकोची नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिडकोच्या 26 हजार 667 घरांची सोडत निघणार आहे. ही सर्व घरे नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यातील अनेक घरे तर रेल्वे स्थानकांशेजारीच आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या या घरांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

नवी मुंबईतील खारघर, कामोठे, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ ही घरे आहे. शिवाय घणसोली आणि तळोज्यातही सिडकोने घरे बांधली आहेत. सिडकोची नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील या घरांची सोडत लवकरच होणार आहे. आधीच्या नियोजनानुसार ती 2 ऑक्टोबरला निघणार होती.

सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होईल, असे सांगितले होते. मात्र सोडतीमधील ऑनलाइन प्रक्रियेत घरांचा राखीव प्रवर्गाची वर्गवारी, त्याच बरोबर इतर काही तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही सोडत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिडकोची 26 विविध ठिकाणी 43 हजार घरे बांधून तयार आहेत. याच घरांची सोडत सिडको मंडळाला काढायची आहे. ही घरे ज्या इमारतीत आहेत, त्या 11 ते 20 मजल्याच्या आहेत. आर्थिक दुर्बल उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये ही घरे मिळणार आहेत.