CIDCO Tendernama
मुंबई

'त्या' जागेच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत पडली ६७८ कोटींची भर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील नेरुळ येथील एका निवासी आणि व्यावसायिक वापराच्या जागेमुळे शहर आणि औद्योगिक विकास प्राधिकरण अर्थात सिडकोला 'छप्पर फाड' फायदा झाला आहे. या ३,०६९ स्क्वेअर मीटर जागेचा ई-लिलाव गेल्या आठवड्यात पार पडला. त्यात एका स्क्वेअर मीटरला ३.८५ लाखांचा भाव मिळाला. याद्वारे सिडकोच्या तिजोरीत ६७८ कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे.

याआधी २०१६मध्ये सानपाडा सेक्टर-१३ मधील ३,०६९ स्क्वेअर मीटरच्या जागेला तीन लाख ३९ हजार ३३९ रुपयांची विक्रमी बोली लागली होती. सोमवारी ई-लिलाव प्रक्रियेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत एखाद्या जागेला मिळालेली हा सर्वाधिक बोली ठरली. सीवूड परिसरातील नेरुळ नोडमध्ये येणाऱ्या नेक्सस मॉलजवळ ही जागा आहे. या जागेला ११८.४ कोटी रुपये किंमत मिळेल, असा अंदाज होता; प्रत्यक्षात पाच प्लॉटमधून सिडकोची ६७८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे.

सिडकोने निवासी कम व्यावसायिक वापराच्या एकूण १६ जागा लिलाव प्रक्रियेत ठेवल्या होत्या. त्यापैकी १० जागांचा लिलाव ३ ऑगस्टला पार पडल्यानंतर ५ ऑगस्टला निकाल लागला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी उर्वरित जागांवर ई-बोली लावण्यात आली. दरम्यान, नेरुळ नोडमधील १,२२१ आणि २,०२९.९७ स्क्वेअर मीटर या दोन जागांना अनुक्रमे तीन लाख २७ हजार ९९९ रुपये आणि तीन लाख ७६ हजार ९९९ रुपये इतका भाव मिळाला. नवी मुंबईतील बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरेश छेडा म्हणाले की, "शहरातील मोक्याच्या ठिकाणी ही जागा असल्याने एका इमारतीत ५० मजले उभारता येऊ शकतात. त्यामुळेच या जागेला विक्रमी किंमत मिळाली." नेरुळ येथील पामबीच रोडजवळ एनआरआय कॉम्प्लेक्स येथे सेक्टर ५४, ५६ आणि ५८ येथे असलेल्या २,५१,१३८.८६ स्क्वेअर मीटर जागेची आधारभूत किंमत एक लाख ३६ हजार ६२७ रुपये स्क्वेअर मीटर इतकी ठेवण्यात आली होती; मात्र या जागेला प्रति स्क्वेअर मीटर एक लाख ५१ हजार २०० रुपये इतकी बोली लागली. "सीआरझेड आणि एनएमएमसीच्या आरक्षणामुळे या जागेकडे खरेदीदार आकर्षित झाले नाहीत," असेही छेडा म्हणाले.