Navi Mumbai Airport Tendernama
मुंबई

CIDCO : मोठी बातमी; सिडकोचे 'त्या' रस्त्यांसाठी तब्बल साडेतीन हजार कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

Navi Mumbai Airport मुंबई (Mumbai) : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (नैना प्रकल्प) पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडकोने (CIDCO) प्रकल्पातील ८ ते १२ क्रमांकाच्या नगर नियोजन योजनेतील २० मीटर आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी ३ हजार ४७६ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले.

यापूर्वीही सिडकोने नैना प्रकल्पातील नगर नियोजन योजना क्रमांक २ ते ७ करिता ३ हजार १०० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. दोन्ही टेंडर प्रक्रिया वेळीच पार पडल्यास पुढील पाच वर्षांत नैना क्षेत्रात टप्प्याटप्प्याने तब्बल साडेसहा हजार कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत.

सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाप्रमाणे नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा असणाऱ्या नैना प्रकल्पातील सर्वच नगर नियोजन योजनेत रस्त्यांच्या कामांना गती दिली जात आहे.

नैना प्रकल्पातील रस्ते विनासिग्नल असावेत यासाठी हितेन शेठी असोशिएट्स ही कंपनी मार्गदर्शन करणार आहे. या कंपनीला एकूण रस्ते बांधणीच्या खर्चातून २ टक्के रक्कम दिली जाणार आहे. याच कंपनीच्या देखरेखीखाली हे रस्ते बांधले जाणार आहेत. हे रस्ते बनविताना कमीत कमी सिग्नल यंत्रणेविना रस्ते बांधले जातील.

सरकारने नैना प्रकल्पातील नगर नियोजन योजना क्रमांक ७ ते १२ यासाठी लवादाची नेमणूक केली नाही. तरीही रस्त्यांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून हे रस्ते जाणार आहेत, त्यातील अनेक शेतकऱ्यांबरोबर सिडको मंडळाने चर्चा देखील केली नाही.

सर्वच शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोध नाही. त्यामुळेच नैना समर्थकांची सभा आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतली होती. परंतु सिडको प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवाद शेतबांधावर झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या रस्त्यांसाठी जात असलेल्या जमिनींचा मोबदला भूखंड स्वरुपात किती मिळेल याची लेखी माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांचे समर्थन नैना प्रकल्पाला मिळेल अशी शक्यता आहे.