मुंबई (Mumbai) : 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून 93 टक्के काम पूर्ण झाले आहे, तर 7 टक्के काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
साधारण जानेवारी महिन्यात वरळी ते वांद्रे अशी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी वाहतूकही प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे ४५ मिनिटांचा हा प्रवास १२ मिनिटांत करता येणार आहे. सध्या वांद्रा येथून वरळी-वांद्रे सागरी सेतूने वरळीच्या दिशेने येता येते. मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे.
कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते वांद्रे सी लिंक पहिला टप्पा 12 सप्टेंबर 2024ला प्रवाशी सेवेत दाखल झाला आहे, तर दुसरा टप्पा वांद्रे ते वरळी जानेवारी मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज महापालिकाने व्यक्त केला. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान दुसऱ्या बोगद्यातील वरळीकडे जाणारी मार्गिका 11 जून 2024 रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बोगद्यातील दुसरी मार्गिका 11 जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर सुमारे 70 टक्के वेळेची बचत तर 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे तसेच ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मोठी मदत होणार आहे.