Local train Tendernama
मुंबई

मुंबई मेट्रोला टक्कर देण्यासाठी लोकलमध्ये होणार हे बदल...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लाइफलाइन (Lifeline) समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे (Local Train) सेवेला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने एसी रेल्वे गाड्यांची संख्याही वाढविली जाणार असून, एसी गाड्यांच्या डब्ब्यांमध्ये मेट्रो प्रमाणे सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच्या टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

तत्कालीन व्ही. टी. स्टेशन ते कुर्ला या हार्बर मार्गावर १९२५ मध्ये पहिली ईएमयू (EMU) धावली होती. पुढे तिचेच रुपांतर लोकल रेल्वे सेवेत करण्यात आले. चार डब्ब्यांच्या ईएमयू पासून सुरू झालेला हा प्रवास आता वातानुकूलित (AC) लोकल पर्यंत पोहचला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल गाड्या चालविल्या जातात. सध्या मुंबईत लोकल गाड्यांच्या सुमारे तीन हजारांहून अधिक फेऱ्या होतात.

एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी २०२३ पर्यंत एसी लोकलची संख्या वाढविली जाणार आहे. मुंबई मेंट्रो प्रमाणेच लोकल ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये एसी आणि इतर सुविधां पुरविण्यासाठीचे डिझाईन आणि इतर बाबींना अंतिम रुप दिले जात आहे. यासाठीच्या टेंडरची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे.

नव्याने डिझाईन करण्यात येणाऱ्या एसी लोकलच्या डब्ब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी अधिक चांगली सुविधा दिली जाणार आहे. नव्या एसी गाड्यांमध्ये मेट्रो प्रमाणे आतील इंटेरिअर असणार आहे. त्याच बरोबर लगेजसाठी वेगळे कंपार्टमेंट असणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या चर्चेगेट, तसेच विरार, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - कल्याण - बदलापूर आणि सीएसएमटी - पनवेल दरम्यान एसी लोकल चालविली जाते.