Railway Tendernama
मुंबई

भंगार नहीं अंगार है! मध्य रेल्वेची तीन महिन्यात शंभर कोटींची कमाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेने (Central Railway) शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या तीन महिन्यात भंगार विक्रीतून शंभर कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. मध्य रेल्वेच्या इतिहासात तीन महिन्यांच्या कालावधीतील शंभर कोटीं रुपयांचा महसूल हा सर्वाधिक असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने 'शून्य भंगार' अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेने आपल्या पाचही विभागातून एप्रिल- जून २०२२ या कालावधीत भंगारातून आतापर्यंतचा सर्वाधिक १००.०८ कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. मध्य रेल्वेचा आतापर्यतचा हा सर्वाधिक महसूल असल्याचा दावा आहे. चालू वर्षात एप्रिल ते जून २०२२ दरम्यान, मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून १००. ८ कोटी रुपयांचा महसूलाची नोंद केली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील म्हणजेच एप्रिल ते जून २०२१ पर्यंत प्राप्त झालेल्या ६१.४२ कोटी महसुलाच्या तुलनेत ६२.९४% अधिक आहे. मध्य रेल्वेने मिळवलेला १००.०८ कोटीचा भंगार विक्री महसूल हा एप्रिल ते जून या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून कोणत्याही वर्षातील सर्वाधिक प्राप्त महसूल आहे.

मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील आणि कार्यशाळेमधील हे भंगार आहे. यामध्ये डबे, वॅगन, लोकोमोटिव्ह स्क्रॅप रुळ आदींचा समावेश आहे. दरवर्षी मध्य रेल्वे भंगाराची विल्हेवाट लावत असते. यामधून मोठा महसूल देखील रेल्वेला मिळतो. मध्य रेल्वेने भंगार साहित्यातून मुक्तता मिळविण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या या उपक्रमाचे काैतुकही केले जात आहे. कारण या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने विकलेल्या या भंगारामध्ये मध्य रेल्वेचे सर्व विभागातील भंगार साहित्य, कार्यशाळेतील साहित्य, शेड आणि विविध डेपोमधील सर्व भंगार विक्री करण्यात आले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार वापरात नसलेले साहित्य डबे लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.