Central Railway Tendernama
मुंबई

मध्य रेल्वेचे चौथे अत्याधुनिक कारशेड भिवपुरीत; भूसंपादन सुरु

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे 35 हेक्टर जागेवर मध्य रेल्वेचे चौथे अत्याधुनिक कारशेड उभारले जात आहे. 2025 पर्यंत हे कारशेड उभारले जाईल. सध्या त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

लोकल सुरळीत चालण्यासाठी मध्य रेल्वेला कारशेड आणि नाइट स्टेबलिंग डेपोमध्ये लोकल पार्किंग केल्यानंतर त्यांची डोळ्यात तेल घालून कठोर तपासणी करावी लागते. मध्य रेल्वेकडे सध्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा अशी तीन कारशेड असून तेथे या लोकलची देखभाल आणि तपासणी केली जात आहे. मध्य रेल्वेचे चौथे कारशेड कर्जतच्या भिवपुरी येथे होणार असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात येणाऱ्या 238 एसी लोकलना पार्क करण्यासाठी जागा हवी असल्याने हे कारशेड अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे.

मध्य रेल्वेकडे सध्या 160 ते 164 लोकल असून 135 लोकल प्रत्यक्ष वापरात असतात. या लोकलना रात्री व दिवसाही उभे करण्यासाठी आणि भविष्यातील नव्या एसी लोकलसाठी आणखी एका कारशेडची गरज आहे. परंतु वडाळा पोर्ट ट्रस्ट आणि भिवंडी रोड येथील जागा आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने कर्जतच्या भिवपुरी येथे 35 हेक्टर जागेवर अत्याधुनिक कारशेड उभारले जात आहे. 2025 पर्यंत हे कारशेड उभारले जाईल.

मध्य रेल्वे दररोज 1810 लोकल फेऱ्या चालवत असून कोरोनापूर्वी त्यामधून दररोज 45 लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या सुमारे 35 लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. तीन कारशेड आणि रात्रीच्या वेळी स्टेबलिंग डेपोत गाड्या पार्क करून दररोज रात्रीची तपासणी केली जाते. यावेळी गाडीच्या खालील गियर आणि प्रमुख सुरक्षा उपकरणांची तपासणी केली जाते. रात्री-दिवसाच्या वेळी दर 15 दिवसांच्या अंतराने तपासणी होते. या शेड्यूलमध्ये ब्रेक गियर आणि प्रवाशांना सोयी देणाऱ्या उपकरणांची तपासणी केली जाते. दर 60 दिवसांच्या अंतराने सर्व उपकरणे तपासली जातात. दर आठ महिन्यांच्या अंतराने बॅटरी, लो टेन्शन जंपर्स, कप्लर्स, सस्पेन्शन, व्हील पॅरामीटर्स, रॉड गेज इ. तपासले जातात. तसेच डब्यांचे ड्राय क्लिनिंग, ओलसर कपड्यांनी मॉपिंग, गाड्या धुणे इत्यादी नियमित अंतराने केले जाते. डब्यांमध्ये जंतुनाशकांची फवारणी केली जाते तशीच अनधिकृत पोस्टर्स काढली जातात.