Wadhwan Port 
मुंबई

मुंबई जवळील 'ते' बंदर जगात पहिल्या दहात; 76 हजार कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे नव्याने बारमाही बंदराची उभारणी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बंदर उभारणीसाठी तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बंदरामुळे पुढील १० वर्षांत अप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गाने १२ लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.

जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरणाच्या (जेएनपीए) ७४ टक्के व महाराष्ट्र सागरी मंडळच्या (एमएमबी) २६ टक्के सहभागातून वाढवण बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल, प्रत्येकी चार बहुउद्देशीय बर्थ व द्रव्यरूपातील कार्गो हाताळणारे बर्थ यांच्या उभारणीसह तटरक्षक दलासाठी, रोरो सेवेसाठी तसेच सागरी कामांसाठी स्वतंत्र बर्थ उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. याखेरीज बंदराला जोडणारे रस्ते, स्वतंत्र रेल्वेमार्ग या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आल्याचे बैठकीच्या टिप्पणांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

वाढवण बंदराच्या उभारणीला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी परवानगी दिल्यानंतर त्याबाबत हरकत घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने १८ एप्रिल २०२४ रोजी फेटाळली. तत्पूर्वी १९ जानेवारी २०२४ रोजी पर्यावरणीय जन सुनावणीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने बंदराला मान्यता दिली होती. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळेपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी प्रलंबित राहिली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्प मंजूर करण्यात आला.

वाढवण बंदराची वैशिष्ट्ये -

● १८ ते २० मीटरची नैसर्गिक खोली

● २४,००० कंटेनर क्षमतेपेक्षा मोठी जहाजे नांगरणे शक्य

● जगातील पहिल्या १० बंदरापैकी एक बंदर ठरेल

● सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरावरील अवलंबित्व संपुष्टात

● स्वच्छ मालवाहू (ग्रीन कार्गो) ची हाताळणी करण्याचे नियोजन