Pune Metro Tendernama
मुंबई

ठाणे आणि पुण्याला नव्या मेट्रो मार्गांची भेट; 15 हजार कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रील ठाणे आणि पुणे या शहरांना नव्या मेट्रो मार्गांची भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासाठी ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला तर पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (टप्पा एक) स्वारगेट ते कात्रज या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी हिरवा कंदिल दाखविला.

महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसोबतच बंगळूरच्या मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला त्याचप्रमाणे बिहार व पश्चिम बंगालमधील दोन नव्या विमानतळ सुविधांना देखील मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती- प्रसारण मंत्री व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली. ठाण्यातील २९ किलोमीटर लांबीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला आणि पुण्यातील मेट्रोच्या स्वारगेट - कात्रज विस्तारीत मार्गाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे शहर असलेल्या ठाण्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पात १२ हजार २६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ठाण्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन रिंग मेट्रो प्रकल्पाच्या संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला. मुंबई मेट्रोचे अन्य मार्ग आणि मुंबई उपनगरीय रेल्वे मार्ग देखील या रिंग मेट्रोला जोडले जाणार आहेत. यासोबतच बुलेट ट्रेनचा मार्ग देखील या रिंग मेट्रोला जोडला जाणार असल्याने ठाण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक असेल. महाराष्ट्र सरकारच्या महामेट्रो कंपनीकडे या प्रकल्पाची जबाबदारी असेल हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत (टप्पा एक) स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मार्गाच्या विस्ताराला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे मंत्री वैष्णव म्हणाले. फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपये खर्च होतील. हा विस्तारीत मार्ग लाईन -१ बी म्हणून ओळखला जाईल. यामुळे मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगर हे भाग मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहेत. फेब्रुवारी 2029 पर्यंत तो पूर्ण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होणार असून या परिसरातील बस व रेल्वे स्थानक, राजीव गांधी प्राणिशास्त्र उद्यान, तळजाई हिलॉक (टेकडी), मनोरंजन केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रे यामुळे जोडले जातील. या मालिकेत बंगळूर मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. या ४४.६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पावर १५ हजार ६११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे बंगळूरमधील मेट्रो प्रवासी संख्या २६ लाखापर्यंत पोहोचेल.