Tunnel Tendernama
मुंबई

Bullet Train: BKC ते शीळ फाटा 21 km बोगद्याचे टेंडर 'या' कंपनीला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRC) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (Mumbai - Ahmedabad Bullet Train Project) २१ किमी लांबीच्या वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळ फाटा बोगद्याच्या (BKC To Shil Phata Tunnel) कामाचे तांत्रिक मूल्यमापनानंतर आर्थिक टेंडर उघडण्यात आली आहेत. सी-२ पॅकेजच्या या कामासाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन टेंडर सादर झाली होती. यात एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे टेंडर कमी दराचे ठरले आहे. त्यामुळे हे टेंडर 'एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर'ला मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किमी लांबीचा असून सुरुवातीचे वांद्रे-कुर्ला संकुल स्थानक भूमिगत आहे. तर २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीखालून जाणारा ७ किमी लांबीचा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा असणार आहे. 

वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळ फाट्यापर्यंत २१ किमी लांबीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांसाठी एकच असणार आहे.

सी-२ पॅकेजमध्ये बोगद्याच्या जवळ आसपास ३७ ठिकाणांवर ३९ उपकरणांच्या खोलीची निर्मिती केली जाणार आहे. बोगद्यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेड टीबीएम मशीनचा वापर केला जाणार आहे.

बोगद्याच्या १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाणार असून उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरण्यात येणार आहे. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असणार आहे. त्याचा सर्वात खोल भाग शिळ फाट्याजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटरवर असणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, विक्रोळी आणि सावळीमध्ये अनुक्रमे ३६, ५६ आणि ३९ मीटर खोलीवर तीन यांत्रिक उपकरणे (शाफ्ट) टाकण्यात येणार आहेत.

घणसोलीत ४२ मीटरचा इंक्लिनेड शाफ्ट आणि शिळफाटामध्ये टनेल पोर्टल एनएटीएममार्फत सुमारे ५ किमी बोगद्याचे काम होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळी येथील ३.९२ हेक्टर क्षेत्रातील एकूण १,८२८ झाडे तोडण्यात येणार आहेत. या झाडांच्या बदल्यात ५,३०० झाडे लावण्याचा निर्णय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. ३.९ हेक्टर भूखंडापैकी २ हेक्टरवर ट्रॅक्शन सबस्टेशन आणि डिस्ट्रिब्यूशन सबस्टेशनच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार असून, या परिसरातील एकूण झाडांची संख्या १,२४३ इतकी आहे.

त्याचप्रमाणे, बांधकाम क्षेत्रात १.९ हेक्टर जागेत बोगद्याच्या कामासाठी आणि वायूविजनासाठी (वेंटिलेश) इमारत बांधण्यात येणार असून, या परिसरात एकूण ५८५ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यात येणार असून, वन विभागामार्फत ५,३०० झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच १४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.