Mumbai Metro

 

Tendernama

मुंबई

मुंबईत 'या' दोन मेट्रो मार्गिकांसाठी ७,७०० कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) सध्या सात मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली आहेत. आता लवकरच आणखी दोन मेट्रो मार्गाच्या कामांची भर त्यात पडणार आहे. सुमारे ७,७०० कोटींचं बजेट असलेल्या या कामांसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागविण्यात आले आहे.

गायमुख ते मीरारोड 'मेट्रो १०' आणि कल्याण ते तळोजा 'मेट्रो १२' मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून पुढील सहा महिन्यांत या मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी एमएमआरडीएने 'मेट्रो १०' आणि 'मेट्रो १२' मार्गिकांची आखणी केली. कल्याण ते तळोजा अशी २०.७५ किमी लांबीची 'मेट्रो १२' मार्गिका असणार आहे. यात एकूण १८ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेच्या कामासाठी अंदाजे ४,१३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 'मेट्रो १०' मार्गिका ९.२ किमी लांबीची असून ही मार्गिका गायमुख ते शिवाजी चौक (मीरारोड) अशी आहे. या मार्गिकेच्या कामासाठी अंदाजे ३,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर केवळ चार मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. 'मेट्रो १०'मुळे ठाणे ते मीरारोडमधील अंतर कमी होऊन प्रवास वेगवान होणार आहे. तर 'मेट्रो १२'मुळे ठाणे आणि नवी मुंबई शहर जवळ येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मेट्रो मार्गिका एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता या दोन्ही मार्गिकांच्या कामाला सुरुवात होणार असल्याने एमएमआरमधील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

या दोन्ही मार्गिकांच्या कामाला यापूर्वी सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांमुळे कामास विलंब झाला आहे. पण आता दोन्ही मार्गिकांची कामे हाती घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मागील आठवड्यात 'मेट्रो १०' आणि 'मेट्रो १२'साठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता टेंडर मागविण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. पुढील महिन्याभरात सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन येत्या सहा महिन्यांत या दोन्ही मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मेट्रो १०
गायमुख ते शिवाजी चौक (मीरारोड) ९.२ किमी लांबीची मार्गिका.
गायमुख रेती बंदर, वर्सोवा चार फाटा, काश्मिरा आणि शिवाजी चौक अशा मेट्रो स्थानकांचा या मेट्रो मार्गिकेत समावेश असेल.
अपेक्षित खर्च ३६०० कोटी.

मेट्रो १२
कल्याण ते तळोजा २०.७५ किमी लांबीची मार्गिका १८ मेट्रो स्थानकांचा समावेश
कल्याण एपीएमसी, गणेश नगर (कल्याण), पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुतने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे,वाक्लन, तुर्भे, पिसार्वे आगार, पिसार्वे आणि तळोजा अशा मेट्रो स्थानकांचा समावेश.
४१३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित.