Mumbai Metro Tendernama
मुंबई

आली रे आली! मेट्रो-3च्या पहिल्या ट्रेनचे डबे मुंबईत दाखल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गाच्या पहिल्या ट्रेनचे चार डबे मुंबईत मंगळवारी (ता.2) पहाटे दाखल झाले. हे डबे चार ट्रेलर्सवर आंध्र प्रदेशातील श्रीसिटी पासून 1400 किमी अंतर 13 दिवसात ओलांडून मुंबईत पोचले आहेत. आणखी चार डबे लवकरच मुंबईत पोहचणार आहेत.

मेट्रो 3 चे कारशेड आरे मध्ये बनविण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला आहे. आरे मध्ये कारशेड बनविण्यास पर्यावरण संघटनांकडून विरोध होत असतानाच मेट्रोच्या चाचणीची तयारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) सुरू केली आहे. त्यासाठी आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आलेल्या ट्रेनचे चार डबे मुंबईत आणण्यात आले आहेत. 42 टन वजनाचा प्रत्येक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून आणण्यात आला. या 8-एक्सेल ट्रेलर्सना 64 चाके असतात.

या डब्यांची जुळवणी करून सारिपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक ट्रेन थाटली जाईल. येथेच चाचणी ट्रॅकसुद्धा उपलब्ध आहे. तात्पुरत्या सुविधेपासून मरोळ नाका मेट्रो स्थानकापर्यंतच्या 3 किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर चाचण्या घेण्यात येतील.