Shivaji Park Tendernama
मुंबई

अबब! शिवाजी पार्कात फक्त पाणी मारण्यासाठी BMCचे 1 कोटीचे टेंडर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात पाणी मारण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) वर्षभरासाठी १ कोटींचे टेंडर काढले आहे. साधारणपणे दिवसाला त्यावर ६० हजारांचा खर्च केला जाणार आहे. मैदानात ३३ विहिरी आहेत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले आहे. त्यावर चार कोटी खर्च झाले आहेत. तरी सुद्धा या कामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणावे लागणार आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पैसे गेले कुठे, असाही सवाल केला जात आहे.

सत्ताधारी शिवसेनेने स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समाधी स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कलाही भ्रष्टाचारात सोडले नाही, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राज्य सचिव प्रकाश बेलवडे - पाटील यांनी केला आहे. मैदानात पाणी मारण्याच्या कामाच्या टेंडर मधून शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हेच मैदान पैसे खाण्याचे कुरण होणार आहे. हा भ्रष्टाचार शिवसेनेला नक्कीच येत्या महानगरपालिका निवडणुकीत मातीत घालेल असाही आरोप त्यांनी केला आहे. येत्या दिवसांमध्ये या कामाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

माहीम पार्कचे १९२७ साली नामांतर होऊन जनतेसाठी फक्त खेळासाठी या शिवाजी पार्क मैदानाचे लोकार्पण झाले. स्थानिक रहिवाशांनी अनेक प्रकारे जी साऊथ विभागात मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाच्या समस्येसाठी विविध शिष्टमंडळातून पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये दैनंदिन पाणी न मारणे आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी अनावश्यक माती न टाकणे यासारख्या उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. स्थानिक अधिकारी आणि रहिवाशांच्या बैठकीतूनही हा प्रश्न सुटलेले नव्हता. पण वर्षाला १ कोटी खर्च करण्याची टेंडर प्रक्रिया जाहीर झाली आहे, असे बेलवडे यांचे म्हणणे आहे.

शिवाजी पार्क हे मैदान ४५ दिवस विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित ठेवले जाते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे हे मैदान ओलसर राहते. त्यामुळे १५२ दिवसांत मैदानात पाणी मारण्याची गरज नाही. तर कंत्राटदार १६८ दिवस पाणी मारणार आणि गवत लावणार आहे. गवत लावण्यासाठीही १५ दिवस मैदान खेळाडूंसाठी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे फक्त १६८ दिवसांसाठी मुंबई महानगरपालिका १ कोटी रुपये वर्षाला खर्च करत आहे. म्हणजे दिवसाला ६० हजार रूपये खर्च करत आहे. मैदानात ३३ विहिरी आहेत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले आहे. त्यामुळे चार कोटी खर्च करुनही या कामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणावे लागेल अशी तरतूद केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पैसे गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. हा विषय घेऊन आम्ही राज्यपाल आणि महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आहोत. आदित्य ठाकरे विनंती करूनही वेळ देत नाहीत. उलट सत्ताधाऱ्यांनी १४९ ची नोटीस देऊन दडपशाही केल्याचेही बेलवडे म्हणाले.