मुंबई (Mumbai) : भरपावसातही खड्डे बुजवता यावेत यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) वॉर्डच्या मागणीनुसार यावर्षी 3 हजार मेट्रिक टन 'कोल्ड मिक्स' (Cold Mix) तयार करण्याचे नियोजन केले असून, यातील तब्बल 1325 मेट्रिक टन 'कोल्ड मिक्स' तयार करून 24 वॉर्डमध्ये वितरीतही करण्यात आले आहे. 'कोल्ड मिक्स'साठी यावर्षी महापालिका 6 कोटी रुपये खर्च करीत आहे.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील पावसाळापूर्व कामे वेगात सुरू आहेत. यामध्ये पावसाळ्यात मुंबईकरांना मनस्ताप ठरणारे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले 'कोल्ड मिक्स' वापरत आहे. सुरुवातीला परदेशातून आणले जाणारे 'कोल्ड मिक्स' आता महापालिकेच्या वरळी येथील प्लांटमध्ये बनवले जात आहे. पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी 24 वॉर्डकडून 3099 मेट्रिक टन 'कोल्ड मिक्स'ची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार सुमारे 70 टक्के कोल्ड मिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व वॉर्डच्या साठवणूक क्षमतेनुसार याचे वितरण केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'कोल्ड मिक्स'चा वापर करताना सुरवातीला परदेशातून अद्ययावत तंत्रज्ञान असलेले 'कोल्ड मिक्स' आणले जात होते. एका किलोसाठी महापालिकेला 177 रुपये खर्च येत होता. मात्र महापालिका याच तंत्रज्ञानाचे आणि त्याच दर्जाचे 'कोल्ड मिक्स' वरळी येथील अस्फाल्ट प्लांटमध्ये स्वतः केवळ 28 रुपये प्रतिकिलो या किंमतीत बनवत आहे. प्रतिबॅग 25 किलोची बनवली जाते. त्यामुळे एका किलोमागे महापालिकेचे 149 रुपये वाचत आहेत. दरम्यान, सर्व वॉर्डकडून झालेल्या मागणीनुसार बनवण्यात येणाऱ्या 'कोल्ड मिक्स'साठी या वर्षी महापालिका 6 कोटी रुपये खर्च करीत आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा चौकोनी किंवा त्रिकोणी कट घेतला जातो. यानंतर तुटलेला संपूर्ण भाग काढून टाकला जातो. यानंतर प्रचंड प्रेशरने हवेच्या माध्यमातून खड्डा स्वच्छ करून घेतला जातो. यानंतर कोल्ड मिक्स टाकून रोलिंग केले जाते. साधारणतः अर्ध्या ते एका तासात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येतो. 'कोल्ड मिक्स'ने खड्डा बुजवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यातही खड्डेमुक्त रस्ते मिळणार असून प्रवास सुखकर होणार आहे.