Aarey Colony Tendernama
मुंबई

मुंबई महापालिका 'आरे' कॉलनीत बांधणार Animal Friendly Road

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : खड्डेमुक्त-वर्षानुवर्षे टिकणाऱ्या सिमेंटच्या मार्गासह रस्त्याखाली प्राण्यांना ये-जा करण्यासाठी 18 भूमिगत बोगदे असणारा रस्ता मुंबई महापालिका 'आरे' कॉलनीत तयार करीत आहे. विशेष म्हणजे 7.2 किमी रस्त्याच्या या कामात एकाही झाडाला धक्का लावण्यात येणार नाही. या रस्त्याच्या कामासाठी महापालिका सुमारे 38 कोटींचा खर्च करणार आहे. (BMC - Animal Friendly Road)

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे संवर्धन करून विकासकामे केली जात आहेत. यामध्ये 'आरे' कॉलनीत बनवण्यात येणारा रस्ता आदर्श ठरणारा आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग ते पवईच्या मुरारजी नगरपर्यंत 7.2 किमीचा हा रस्ता आहे. या रस्त्याचे नियोजन करताना झाडे वाचवून, झाडे नसलेल्या मार्गातून रस्ता तयार करण्यात येत आहे. दिनकरराव देसाई मार्गासह परिसरात आतापर्यंत केलेल्या कामात एकही झाड तोडण्यात आलेले नाही.

प्राण्यांची वाट असणाऱ्या 'पॉइंट'वर 18 भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे 5 मीटर - 3 मीटरचे असतील. त्यामुळे या मार्गात प्रकाश आणि हवा खेळती राहण्यास मदत होणार आहे. काँक्रिट रोडमुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे मनुष्यबळ, खर्च आणि वेळ वाचणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी पालिका सुमारे 38 कोटींचा खर्च करणार आहे. जानेवारीपासून या रस्त्याचे काम सुरु झाले असून काम पूर्ण करण्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. आतापर्यंत रस्त्याचे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. रस्त्यावर एलईडी लाईटची व्यवस्थाही असेल.

महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणपूरक रस्त्याच्या कामाची पाहणी करून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. झाडे वाचवून पालिकेच्या माध्यमातून, पर्यावरण खात्याच्या सहकार्यातून बनवला जाणारा पर्यावरणपूरक रस्ता 'आरे'साठी 'परफेक्ट' असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हा रस्ता 'आरे'तील प्राण्यांसाठीही योग्य ठरणार असल्याचेही सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.