मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील १२ उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांची दुरुस्ती करून त्यांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने (BMC) घेतला आहे. त्यासाठी २३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाचे टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हे काम दोन टप्प्यात होणार आहे. काही कामे पावसाळ्यापूर्वी, तर काही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत. २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सगळ्याच पुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. त्यानुसार पुलांची सुरक्षा तपासण्यात आली.
काही पूल हे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत, तर काही पूल रेल्वेच्या हद्दीत आहेत. त्यामुळे संयुक्त तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोणत्या पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, याची यादी तयार करण्यात आली. या यादीतील पुलांची दुरुस्ती करून ते मजबूत केले जाणार आहेत. एक प्रकारे पुलांचे आयुर्मान वाढण्यावर भर आहे.
दुरुस्तीसाठी निवडण्यात आलेले १२ पूल दोन्ही द्रुतगती महामार्गावरील आहेत. यापूर्वी हे महामार्ग आणि त्यांच्या डागडुजीची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएकडे होती. अलीकडेच हे महामार्ग एमएमआरडीएने महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. या महामार्गावरील पुलांची आणि भुयारी मार्गांची डागडुजी करण्यासाठी टेेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ज्या १२ पुलांची कामे होणार आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. सर्वाधिक कामे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील पुलांची आहेत. सध्या काही पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल, गोखले पूल, विद्याविहार रेल्वे पूल, माहीम कॉजवे येथील मिठी नदीवरील पूल आदी पुलांचा समावेश आहे.