BMC Tendernama
मुंबई

BMC Tender : बीएमसीचे पहिल्या टप्प्यातील नालेसफाईसाठी 70 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मान्सूनपूर्व लहान-मोठ्या नाल्यातील गाळ उपसा करणे, रस्त्यांवरील कल्व्हर्टस साफ करणे, बाॅक्स ड्रेन, रोड साईड ड्रेनमधील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या (BMC) पर्जन्य जल वाहिनी विभागाने कंबर कसली आहे. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी सुमारे ७० कोटींची टेंडर (Tender) प्रसिद्ध केली आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसा केल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. परंतु पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने मुंबई महापालिकेवर टीकेची तोफ डागली जाते. गेल्या वर्षी २०२३ मध्ये नाल्यातील गाळ उपसा करणे, मिठी नदीतील गाळ उपसा करणे यासाठी २८० कोटींचा खर्च करण्यात आला होता. परंतु गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता यंदा नाल्यातील गाळ काढण्यासाठी जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातील टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यात लहान-मोठ्या नाल्यातील गाळ उपसा करणे, रस्त्यांवरील कल्व्हर्टस साफ करणे, बाॅक्स ड्रेन, रोड साईड ड्रेनमधील गाळ काढण्यासाठी शनिवारी टेंडर मागवण्यात आली आहेत. शहरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी सुमारे २० कोटी, पूर्व उपनगरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी २२ कोटी, तर पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. शनिवारी यासाठी टेंडर मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला टेंडर देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाकडून देण्यात आली.

दरवर्षी ३१ मेपर्यंत नाल्यातील १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. यंदाही मे महिन्यापर्यंत १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून टप्याटप्याने टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण १०० टक्के नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत काढण्यात येतो. पावसाळ्यात १० टक्के तर पावसाळ्यानंतर १५ टक्के नालेसफाई करण्यात येते.

कुठे, किती अंतराचे नाले?

मुंबई शहर
नाले : २७, अंतर किमी : २१.९७

पूर्व उपनगर
नाले : १११, अंतर १०२.१ किमी

पश्चिम उपनगर
नाले : १४२, अंतर १३९.८४ किमी