Manhole, BMC Tendernama
मुंबई

BMC News : तब्बल 50 हजार मॅनहोल्स संरक्षक जाळ्यांच्या प्रतीक्षेत; Tender रखडवणाऱ्यांवर काय कारवाई करणार?

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : मुंबईतील पर्जन्य जलवाहिनी आणि मलनि:सारण वाहिन्यांवरील मॅनहोल्सवर सुमारे ९४ हजार संरक्षक जाळ्या (Manhole Covers) बसवणे आवश्यक आहे. मात्र, २४ मे २०२४ पर्यंत त्यापैकी फक्त ४३, ५८१ संरक्षक जाळ्याच मॅनहोल्सवर बसवल्याची माहिती पुढे आली आहे. (BMC Tender News)

२४ पैकी १७ विभागात संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झालेले नाही. टेंडर प्रक्रियेत विलंब झाल्याने संरक्षक जाळ्या उपलब्ध होऊन बसविण्यात मोठा अडथळा निर्माण झाल्याची चर्चा आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये मुसळधार पावसात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून जात असताना एलफिन्स्टन येथील सेनापती बापट मार्ग आणि मडूरकर मार्गाच्या जंक्शनवर उघड्या असलेल्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने त्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पडून मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला मुंबईतील रस्त्यांखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी तसेच मलनि:सारण वाहिन्या यांच्या मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे निर्देश दिले होते. मुंबईतील मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना आखाव्‍यात, असे आदेश उच्‍च न्‍यायालयाने दिले होते.

त्यानंतर पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने रस्त्यांवरील गटारांचे प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा कृती आराखडा तयार करून सर्व विभागांच्यावतीने याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र यंदा मान्सून तोंडावर आला तरी महापालिकेला मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचे लक्ष्य गाठता आलेले नाही.

मुंबईतील पर्जन्य जलवाहिनी आणि मलनि:सारण वाहिन्यांवरील मॅनहोल्सवर सुमारे ९४ हजार संरक्षक जाळ्या बसवणे आवश्यक आहे. मात्र, त्यातील २४ मे २०२४ पर्यंत केवळ ४३,५८१ संरक्षक जाळ्याच मॅनहोल्सवर बसवल्याची माहिती मिळत आहे.

मॅनहोल्सच्या जाळ्या पावसाळ्यापूर्वी बसवणे आवश्यक असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली होती आणि त्यात त्यांनी सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील संरक्षक जाळ्या ३१ मे पूर्वी बसवल्या जातील याप्रमाणे युध्दपातळीवर कामे करा, असे निर्देश दिले होते.

तरीही अद्याप ५० टक्केही जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना सुधारीत परिपत्रक जारी करून विहित वेळेत या जाळ्या बसवण्याची कार्यवाही करावी, असे कळवण्यात आले आहे.

मात्र, विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संरक्षक जाळ्या संबंधित खात्याच्या माध्यमातून खरेदी करून विभाग कार्यालयांना उपलब्ध करून दिल्या जात. परंतु यंदा या सर्व जाळ्यांची खरेदी मध्यवर्ती खात्यामार्फत न करता सर्व विभाग कार्यालयांच्यावतीने करण्यात आली.

विशेष म्हणजे मागील पावसाळ्यात याचा कृती आराखडा तयार करून सर्व प्रकारचे निर्णय घेतल्यानंतर या जाळ्यांच्या खरेदीची प्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राबवली गेली. त्यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाळ्या उपलब्ध होण्यास मोठा विलंब होत आहे, परिणामी पावसाळ्यापूर्वी हे लक्ष्य गाठण्याची शक्यता नाही.

मुंबईतील २४ विभाग कार्यालयांपैंकी ७ विभागांमध्ये जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १७ विभाग कार्यालयांमध्येच शिल्लक जाळ्या बसवण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे ज्यांची टेंडर प्रक्रिया आधी झाली त्यांना जाळ्या उपलब्ध झाल्या म्हणून ते बसवून मोकळे झालेत, पण ज्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात सर्व प्रकारची मंजुरी मिळाली, त्यांना जाळ्या कधी मिळणार आणि ते कधी बसवणार असा प्रश्नच उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे याची टेंडर जर मागील वर्षीच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात झाले असते तर सर्व मॅनहोल्सवरील जाळ्या बसवणे शक्य होते, अशी चर्चा आहे.