BMC Tendernama
मुंबई

BMC News : मुंबईत यंदा नालेसफाईवर 250 कोटींचा खर्च; 96 टक्के मोहिम यशस्वी झाल्याचा बीएमसीचा दावा

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) यंदा नालेसफाईला दोन आठवडे उशिराने सुरवात केली असून यंदा या कामांवर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पाऊस गेल्यानंतर अशी तीन टप्प्यात नालेसफाईची कामे करते. 20 मेपर्यंत सुमारे ९६ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

दरम्यान, महानगरपालिकेने, पावसाळ्यापूर्वी म्हणजे 5 जूनपर्यंत नालेसफाईची सर्व कामे अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ वापरून आणि रेल्‍वे, एमएमआरडीए यांसह विविध प्राधिकरणांशी योग्‍य समन्‍वय साधून पूर्ण करावीत, असे आदेश आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

तसेच, महापालिका परिमंडळाचे उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी, आपल्या विभागात दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्‍यक्ष नालेसफाई कामाच्या ठिकाणी धावती भेट देवून पाहणी करावी. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्‍याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात जेणेकरून मुंबईकर नागरिकांना पावसाळयात निर्धोक राहता येईल, असे आदेश देखील महापालिका आयुक्‍त गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम 5 जून अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला दिले.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामाच्या अंतर्गत लहान-मोठ्या नाल्‍यांमधून एकूण 10 लाख 21 हजार 782 मेट्रिक टन गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात आले असून 21 मे पर्यंत 9 लाख 80 हजार 048 मेट्रिक टन गाळ काढण्‍यात आला आहे.

यामध्ये, शहर भागातील नाल्यांमधून 93.67 टक्के, पूर्व उपनगरातील नाल्यांमधून 89.90 टक्के, पश्चिम उपनगरातील नाल्यामधून 91.84 टक्के, मिठी नदीमधून 92.90 टक्के, लहान नाल्यांमधून आणि हायवे लगतच्या नाल्यांमधून प्रत्येकी 100 टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी समोर येत असल्‍या तरीदेखील तरंगत्‍या कचऱ्याची (फ्लोटींग मटेरियल) योग्‍यप्रकारे विल्‍हेवाट लावावी आणि हे करत असताना नाले तुंबता कामा नये याची दक्षताही घ्यावी. तसेच अरूंद नाल्‍याच्‍या ठिकाणी 'ट्रॅश बूम' चा वापर करावा. स्‍थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्‍यांचा सहयोग घ्‍यावा. महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाल्‍यातून गाळ उपसा कामाची पाहणी करावी, असे आदेशही आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील आणि इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी.

विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत. मुंबई महानगरात पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे आदेशही त्यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबई महापालिकेने नालेसफाई कामांबाबत दिलेली आकडेवारी खोटी आहे, असा गंभीर आरोप करीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. तसेच नालेसफाईच्या कामांबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही केली आहे. त्याचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात उमटले. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने बैठक घेवून नालेसफाई कामांचा आढावा घेतला.

यावेळी, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सर्व परिमंडळांचे उप आयुक्‍त, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) श्रीधर चौधरी यांच्‍यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.