BMC Tendernama
मुंबई

BMC : ब्लॅक लिस्टेड कंत्राटदाराला काम दिलेच कसे? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिका (BMC) प्रशासनाकडून ६ हजार कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. काळ्या यादीतील कंत्राटदाराला (Contractor) हे काम देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काम देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी रजा (Ravi Raja) यांनी केली आहे.

रवी रजा यांनी याबाबत सांगितले की, महापालिका प्रशासनाने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांबद्दल नेहमीच मवाळ धोरण ठेवले आहे. त्यांना कंत्राट देवून व्यवसायात परत आणण्याचे मार्ग पालिका अधिकाऱ्यांकडून नेहमीच शोधले जातात. आताही आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट्स या काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला पुन्हा काम देण्यात आले आहे.
पालिका प्रशासनाने आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपनीवर ७ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती आणि नंतर ती ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली होती.

६ हजार कोटी रुपयांच्या सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी दुसऱ्या टप्प्याचे काम अशा कलंकित कंत्राटदारांना दिले जात आहे, हे काम या कंत्राटदाराला दिल्यास, आपण कोणत्या गुणवत्तेची अपेक्षा करू शकतो, असा सवाल रवी रजा यांनी केला आहे.