BMC Tendernama
मुंबई

BMC: गाळाच्या वजनानुसार ठेकेदारांना मिळणार नालेसफाईचे 180 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पावसाळ्याला दोन महिने शिल्लक असले तरी मुंबई महापालिकेच्या (BMC) माध्यमातून शहरात नालेसफाईचे काम वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत 1,87,970.21 मेट्रिक टन म्हणजेच निश्चित केलेल्या टार्गेटपैकी 20 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. 31 मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

महापालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावणे या सर्व कामांची जबाबदारी कंत्राटदारावर (Contractor) आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. यंदा नालेसफाईवर १८० कोटी खर्च केले जाणार आहेत.

मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक केळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्तालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांमधील पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते.

गेल्यावर्षी ही नालेसफाई 11 एप्रिल रोजी सुरू झाली होती, मात्र या वर्षी 6 मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावणे या सर्व कामांची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत.

गेल्या वर्षी टेंडर प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे नालेसफाई 11 एप्रिल रोजी सुरू झाली असली तरी 31 मेपर्यंत 100 टक्के गाळ काढण्याचे टार्गेट पूर्ण करण्यात आले होते. मात्र या वर्षी 6 मार्च रोजी काम सुरू झाल्यानंतर महिना उलटला तरी 20 टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 31 मेची डेडलाईन पाळण्यासाठी महापालिकेला विशेष उपाययोजना करून वेगाने काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नालेसफाईची प्रगती -
मुंबई शहर
32.20 टक्के


पूर्व उपनगर
40.64 टक्के

पश्चिम उपनगर
26.34 टक्के

मिठी नदी
11.69 टक्के

छोटे नाले
12.66 टक्के


मुंबईतील नदी, नाले

मुंबईत एकूण नद्या 5

एकूण छोटे नाले 1508 (लांबी 605 किमी)

एकूण मोठे नाले 309 ( लांबी 290 किमी)

रस्त्याखालील ड्रेन 3134 किमी