BMC Tendernama
मुंबई

BMC आयुक्त चहल पुन्हा 'टार्गेट'; भाजप आमदार म्हणाले...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या टनेल लाँड्री कंत्राटातील अनियमिततेवरून भाजपचे आमदार अमित साटम यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिले असून, कंत्राटातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कंत्राटाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी केली आहे.

त्याच प्रमाणे जर संबंधित अधिकारी आणि व्यक्तींवर कारवाई झाली नाही तर आपण राजकीय दबावाला बळी पडत जनतेच्या पैशाची धुलाई सुरू असलेल्या कंत्राटाला आणि या प्रकाराला एकप्रकारे मूकसंमती देत आहात, असा निशाणा देखील साटम यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर लगावला आहे. या संदर्भात साटम यांनी नुकतेच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी देखील २२ एप्रिल रोजी साटम यांनी आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकार लक्षात आणून दिला होता.

आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आमदार साटम म्हणाले की, 'टनेल लाँड्री कंत्राटाच्या संदर्भात होत असलेल्या संशयास्पद व अनेक नियम धाब्यावर बसवून उघड उघड चाललेला भ्रष्ट कारभार निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडून कोणताही थेट प्रतिसाद न मिळता प्रमुख अभियंत्याच्या मार्फत अत्यंत चलाख व सारवासारव करणार उत्तर मिळाले. हे अतिशय धक्कादायक आहे.

जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या कराचा पैसा लागलेला आहे तिथे पारदर्शकतेचा अभाव व नियमांची पायमल्ली होत असेल तर आपल्यावरही कुणाचा तरी राजकीय दबाव आहे का, अशी शंका येते. हे कंत्राट फक्त टनेल लाँड्री बनविण्यासाठी नसून, टक्केवारीमध्ये हात धुवून घेण्यासाठीच काढले आहे का? मला मिळालेले प्रमुख अभियंत्याचे उत्तर निव्वळ धूळपेक करणारे आहेच, परंतु या पत्राचा सर्व खटाटोप कंत्राटदाराला वाचविण्यासाठीच होता. यामुळे महापालिका प्रशासनाची टक्केवारीसाठी चाललेली केविलवाणी परिस्थिती व अवस्था जनतेसमोर उघडी पडली आहे, असे साटम यांनी म्हटले आहे.