Mumbai

 

Tendernama

मुंबई

'राणीच्या बागेतील टेंडर 'याच' कंपनीसाठी फ्रेम; १०६ कोटींचा घोटाळा'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : टेंडरनामाने दोनच दिवसांपूर्वी भायखळा येथील राणीच्या बागेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे वृत्त दिले होते. याची दखल घेऊन भाजपने राणीच्या बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या टेंडरमध्ये तब्बल 106 कोटी रुपयांचा घाेटाळ्याचा आरोप केला आहे. ठराविक कंपनीला काम मिळेल अशा पध्दतीनेच टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली असून त्याच कंपनीने महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा तब्बल 106 कोटी रुपये जास्त दराने टेंडर भरली आहेत, असा आरोप आहे. या प्रकरणी भाजपने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली आहे.

विरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात ब्लॅक जॅग्वार, चित्ता, पांढरा सिंह, चिंपांझी यासह काही प्राणी परदेशातून आणण्यात येणार आहे. हे प्राणी राणी बागेला मिळवून देण्यासाठी महापालिकेने टेंडर मागवली आहेत. नियमानुसार 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासाठी जागतिक टेंडर मागवावी लागतात. मात्र, महापालिकेने 185 कोटी रुपयांच्या संपूर्ण प्रक्रियेची विभागणी तीन टेंडरमध्ये केली. त्यामुळे स्थानिक पातळीवर टेंडर मागविण्यात आली, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला. या टेंडरमध्ये गैरप्रकार होत असून टेंडर रकमेपेक्षा अधिक रकमेची टेंडर भरली जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविले होते.

भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनीही असेच पत्र महापालिका आयुक्तांना 21 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. 29 नोव्हेंबरला टेंडर उघडण्यात आली, त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी 106 कोटी अधिक रकमेची टेंडर सादर केली आहेत. 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींची टेंडर सादर केली गेली आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर उपस्थित होत्या.

अभ्यास करुन घोटाळा बाहेर काढा
भाजपने पूर्ण अभ्यास करुन घोटाळ्यांचे आरोप करावेत असे प्रतिउत्तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. मिहीर कोटेचा हे बिल्डर आहेत. नंतर ते आमदार झाले. याबद्दल कोणाला आक्षेप नाही. टेंडर देण्याची प्रक्रिया असते. केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला, असेही महापौरांनी नमूद केले.