Deonar Abattoir Tendernama
मुंबई

देवनार कत्तलखान्याच्या नूतनीकरणाचे टेंडर रद्द करा; भाजपची मागणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या फायद्यासाठी देवनार कत्तलखान्याच्या (Deonar slaughterhouse) नूतनीकरणाचे (Renovation) टेंडर काढले आहे, हे टेंडर रद्द करून नव्याने काढण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कोटेचा यांनी हे आरोप केले. या टेंडर प्रक्रियेत सरकारचे काही मंत्री व त्यांच्या निकटवर्तीयांना सुमारे १६० कोटी रुपयांचा मलिदा मिळणार असल्याचा आरोपही कोटेचा यांनी केला आहे.

देवनार कत्तलखान्याच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटींचे टेंडर अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीला फायदेशीर ठरतील अशा अटी व शर्थी टाकण्यात आल्या आहेत. या कत्तलखान्यात दररोज ५०० ते ६०० जनावरांची कत्तल केली जाते. नूतनीकरण टेंडर भरण्यासाठी दररोज सुमारे २५ हजार जनावरांची कत्तल करण्याचा अनुभव हवा, अशी अट घालण्यात आली आहे. संपूर्ण देशात या अटीत बसू शकणारी एकही कंपनी नाही. या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपन्या अलाना सन्स, लुलु ग्रुप यांना हे टेंडर भरता येऊ नये, अशा पद्धतीने अटी घालण्यात आल्या आहेत, असा कोटेचा यांचा आरोप आहे.

हे टेंडर प्रसिद्ध होण्याच्या आधीच अहमदनगरस्थित एका कंपनीने १०० कोटींची मशिनरी कोरियामधून आणण्यासाठी ऑर्डर दिली आहे, अशी आमची माहिती आहे. या टेंडर प्रक्रियेसाठी नेमलेल्या सल्लागाराला गैरप्रकाराबद्दल काळ्या यादीत टाकले होते. कत्तलखान्याच्या नूतनीकरण टेंडरमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण विषयक विषयांचा उल्लेखही नाही. एवढ्या मोठ्या संख्येने जनावरांची कत्तल झाल्यावर प्रचंड कार्बन उत्सर्जन होणार आहे. हे पाहिल्यावर पर्यावरण मंत्री यांची मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठीची योजना हा प्रसिद्धीसाठीचा उपक्रम असल्याचे दिसते, असेही आमदार कोटेचा यांनी नमूद केले.