Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : बायोगॅसपासून उजळणार ग्रँट रोड येथील एलटी मार्केट परिसर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी (CER) कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा १.५ टीडीपी क्षमतेचा बायो-मिथेनेशन प्लांट उभारणार आहे. सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पांतर्गत उत्पादित होणाऱ्या बायोगॅसपासून ग्रँट रोड येथील एलटी मार्केट परिसर उजळणार आहे.

काळबादेवी-गिरगाव (के ३ इमारत) येथील इमारतींसाठी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण मंजुरीचे अनुपालन म्हणून मुंबई मेट्रोने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहकार्याने हा पुढाकार घेतला आहे. “हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन सुलभ करण्यासोबतच महानगरपालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या योग्य व्यवस्थापनही करेल. कचऱ्याच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्यासोबतच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास देखील मदत करेल. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा एक फायदेशीर उपाय ठरणार आहे. मुंबई मेट्रो नेहमीच शहरातील पर्यावरण संतुलित ठेवण्याकरता सकारात्मक योगदान देण्यासाठी वचनबद्ध असून भविष्यातही त्या दृष्टीने कार्य करत राहील,” असे मुंबई मेट्रोचे संचालक (नियोजन आणि रिअल-इस्टेट डेव./NFBR) श्री. आर. रमणा यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोने एम/एस एरोकेअर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. या एजन्सीला इन्स्टॉलेशन, संचलन आणि देखभालीचे काम दिले आहे. या एजन्सीने यापूर्वी महापालिकेच्या समन्वयाने या प्रकारची कामे राबविली आहेत.