मुंबई (Mumbai) : धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची येत्या पंधरा दिवसांत बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी धारावीच्या रहिवाशांना दिले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारात नागरिकांनी पिण्याच्या पाण्यापासून लादीकरण आणि रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांच्या, जुन्या चाळींच्या पुनर्विकासाच्या असंख्य समस्या मांडल्या. विविध शासकीय कमिट्यांच्या नियुक्त्यांपासून विशेष कार्य अधिकारीपदाच्या नियुक्त्यांचीही मागणी झाली. अस्लम शेख यांनी प्रत्येक तक्रार ऐकून घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे नागरी प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.
मुंबईतले पाच वर्षांपेक्षा अधिक रखडलेले एसआरए प्रकल्प रद्द करण्याची घोषणा सरकारने केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प तर गेल्या 18 वर्षांपासून रखडला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी स्थानिक रहिवासी अनिल कासार व तेजस वाघमारे यांनी केली. मात्र त्यावर येत्या 15 दिवसांत धारावी विकास प्राधिकरण व संबंधित संस्थांची बैठक बोलावून धारावीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
भायखळा लव लेनमधील बीआयटी चाळी 100 वर्षे जुन्या आहेत. या चाळींचा पुनर्विकास करण्याची मागणी प्रशांत रणखांबे यांनी केली. पुरातन बाणगंगा तलावातील प्रदूषणाची समस्याही यावेळी मांडण्यात आली. त्यावर हेरिटेज कमिटी, तलावाचे विश्वस्त व स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावण्याचे आश्वासन शेख यांनी दिले. शहरासाठी असलेल्या निधी तलावाच्या कामासाठी देण्याचे आश्वासन दिले.
हँगिग गार्डनपासून पेडर रोडच्या दिशेने जाणारा बी. जी. खेर मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे वाळकेश्वर व नेपीयन्सी रोड परिसरात वाहतुकीची कोंडी होते. या भागात मंत्र्यांचे बंगले आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही त्याचा फटका बसतो. त्यामुळे खेर मार्ग लवकर सुरू करण्याची मागणी प्रमोद मांद्रेकर यांनी केली. त्यावर जून महिन्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल, असे आश्वासन अस्लम शेख यांनी दिले.
यावेळी प्रमोद मांद्रेकर यांनी मलबार हिल राखीव जलाशयातील पाण्याची पातळी कमी असल्याने परिसरातील दक्षिण मुंबईतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याची समस्या मांडली. त्यावर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्याचे आश्वासन शेख यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.