BMC Tendernama
मुंबई

मुंबईच्या पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची घडामोड! 'या' प्रकल्पाचे...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचे टनेलिंग आज पूर्ण झाले. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील मोठ्या लोकवस्तीच्या आणि जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या विभागात येत्या काळात वाढीव पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन जलाशयाच्या टनेलिंगचे काम सुरू आहे.

पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या काही भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व भविष्यातील वाढीव पाणीपुरवठ्याचा विचार करुनच या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत हा एकूण सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असताना देखील त्यावर मात करुन, या जलबोगद्याच्या कामात प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.

बोगद्याच्या खोदकामासाठी, हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदा खनन यंत्र (TBM) ६ मार्च २०२१ रोजी उतरविण्यात आले होते. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. त्याचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्याच्या खोदकामात अनेक भूगर्भीय अडचणीतही आल्या होत्या. तरीही जानेवारी २०२२ या महिन्यात विक्रमी ६५३ मीटर खनन करण्यात आले होते. त्याचवेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरी देखील एकाच आठवड्यात दोनवेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली होती. पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर खनन आज विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.