मुंबई (Mumbai) : एक हजार मेगावॅट क्षमतेच्या कुडूस-आरे पारेषण वाहिनी प्रकल्पाच्या कामास सुरवात करण्यास राज्य शासनाने नुकतीच अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेडला (Adani Electricity Mumbai Infra Ltd.) परवानगी दिली आहे. याद्वारे मुंबईला अतिरिक्त वीजपुरवठा होईल.
मुंबईत २०११ मध्ये वारंवार वीज खंडित झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या समितीच्या अहवालात मुंबईची वीजपुरवठा क्षमता वाढविण्याची गरज नमूद केली होती. मुंबईची पारेषण प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने खारघर-विक्रोळी ४०० केव्ही योजना आणि १००० मेगा वॅटची आरे-कुडूस योजना असे दोन प्रकल्प निश्चित केले. हा प्रकल्प नंतर रिलायन्स एनर्जीकडून अदाणी समूहाने ताब्यात घेतला.
शहरातील वीजवापर दरवर्षी पाच टक्के वाढतो आहे. जमिनीची अनुपलब्धता, वाढते प्रदूषण आणि मुंबईत कोळसा आणण्याचे आव्हान यामुळे शहरात नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारणे अशक्य आहे. तसेच मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या सध्याच्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या क्षमतेत वाढ करणेही शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ही वाहिनी उभारल्यावर शेतकऱ्यांच्या किंवा जागामालकांच्या तक्रारी आल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करून त्यांच्या निराकरणाची जबाबदारीही अदाणी इलेक्ट्रिसिटीवर टाकण्यात आली आहे. कुडूस-आरे एचव्हीडीसी पारेषण वाहिनी म्हणजे मुंबईचे पारेषण जाळे अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे, असे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
मुंबईचा वीजपुरवठा...
- मुंबईची एकूण गरज ३६०० मेगावॅट
- टाटा पॉवर ट्रॉम्बे उर्जा प्रकल्प १४३० मेगावॅट
- अदाणी इलेक्ट्रिसिटी डहाणू प्रकल्प ५०० मेगावॅट
- मुंबईत १५०० मेगावॅट वीज आयात होते