Vistadome coach Tedernama
मुंबई

रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांना जोडलेल्या `व्हिस्टाडोम कोच`ला (Vistadome coaches) प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत ३१ हजार ८२१ प्रवाशांनी या कोचमधून प्रवास करून पर्यटनाच्या आनंद घेतला. मध्य रेल्वेने यातून ३.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता व्हिस्टाडोम कोचची लोकप्रियता पाहून मध्य रेल्वेच्या ताफ्यातील पाचवा विस्टाडोम कोच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला जोडण्यात आला आहे. (Pune - Secunderabad Shatabdi Express)

सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचमधून एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत ३१ हजार ८२१ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यातून रेल्वेला ३.९९ कोटींचा महसूल मिळाला. २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम डबे पहिल्यांदा जोडण्यात आले. या एक्सप्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसला जोडण्यात आले. त्यानंतरही प्रचंड मागणीमुळे मध्य रेल्वेचा तिसरा व्हिस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला. त्यानंतर २५ जुलै २०२२ ला चौथा व्हिस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला. आता पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसलाही व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. बुधवारपासून (ता. १०) व्हिस्टाडोम कोच जोडलेली ही शता मध्य रेल्वेवरील पाचवी एक्सप्रेस असेल.

निसर्गसौंदर्याचा आस्वाद

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोममधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा प्रवासादरम्यान आनंद घेता येईल. हे ठिकाण अनेक अंतर्देशीय आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वादही प्रवाशांना घेता येणार आहे.

...असे आहे वेळापत्रक

१२०२५ पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ६ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. १२०२६ सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री ११.१० वाजता पुण्याला पोहोचेल.