Ravindra Chavan. Tendernama
मुंबई

भराडीदेवी मंदिर परिसराचा कायापालट होणार; रस्त्यांसाठी ११ कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच, या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १०.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी वासियांना विकासकामांची भेट दिली आहे. आंगणेवाडीमधील सोयी सुविधांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणार्या सर्व रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्ता, मालवण बेळणा रस्ता, गोळवण पोईब रस्ता, ओझर कांदळगाव मागवणे मसुरे बांदिवडे आडवली भटवाडी रस्ता, राठीवडे हिवाळे ओवळीये कसाल ओसरगाव रस्ता, चौके धामापूर रस्ता व कुमामे नांदोस तिरवडे सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून, या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

आंगणेवाडी हे मालवण तालुक्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून, तेथील भराडीदेवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून सूमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिध्द सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठी गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. तसेच, बिळवस आंगणेवाडी या ४.३०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम सुध्दा आता लवकरच सुरू होणार आहे. तसेच, चौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर चंदगड तिल्लारी दोडामार्ग रस्त्यावरील मोठ्या धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून, या कामासाठी सुमारे २ कोटीच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

आंगणेवाडीतील श्री भराडीदेवीची यात्रा दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी मार्च मध्ये होत असते. त्यामुळे, या यात्रेच्या पूर्वी या प्रमुख रस्त्यांची कामे व येथील मंदिर परिसर सुसज्ज करण्याच्या दृष्टीने विभागाला आदेश देण्यात आले आहेत. आंगणेवाडीच्या विकास कामांच्या महत्वपूर्ण सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही व पुढील वर्षी येणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या पूर्वीच सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.