मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा बसला आग लागल्याची घटना घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भाडेतत्त्वावर बस सेवा पुरवणाऱ्या ठेकेदार 'मातेश्वरी' कंपनीच्या ४१२ बसेसची सेवा बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. वारंवार आग लागणाऱ्या या बसेसच्या सुरक्षेबाबत तपासणी करण्यासाठी लखनौ येथून टाटा मोटर्सची टीम मुंबईत दाखल झाली आहे. पुढील आठवडाभर ही तपासणी सुरू राहणार आहे.
मुंबईत 'बेस्ट'च्या साडेतीन हजार बसेस दररोज रस्त्यावर धावतात. यामध्ये 'बेस्ट'च्या स्वत:च्या गाड्यांसह भाडेतत्त्वावरील गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील 'मातेश्वरी' कंपनीच्या माध्यमातून धारावी, सांताक्रुझ आणि प्रतीक्षानगर आदी आगारात सेवा पुरवली जाते. मात्र 'मातेश्वरी' कंपनीच्या बसला मंगळवारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीने सेवा थांबवून दुर्घटना रोखण्याची हमी द्यावी, नंतरच सेवा सुरू करावी, असे आदेश महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी तातडीने दिले. या पार्श्वभूमीवर संबंधित 36 मार्गांवर 'बेस्ट'कडून 297 बसही सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कंत्राटी चालकांना वेतन वेळेकर मिळत नसल्याने माधव पाटील या ठेकेदाराला 'बेस्ट' प्रशासनाने नोटीस देऊन तीन कोटींचा दंड ठोठावला आहे. संबंधित कंपनीने दंड आकारू नये अशी विनंती केली आहे, मात्र प्रशासन दंड आकारण्यावर ठाम असल्याने संबंधित कंपनीने सेवा देणार नाही असे सांगत सेवा थांबवल्याने प्रतीक्षानगर डेपोत 270 बसेस उभ्या आहेत. तर पाच कंत्राटी कंपन्यांपैकी दोन कंत्राटी कंपन्यांची सेवा बंद केल्याने एकूण 682 बसेस सद्यस्थितीत बस आगारात उभ्या आहेत.