BEST Tendernama
मुंबई

BEST : 'बेस्ट'चा दणका; 700 डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात अपयशी ठरलेली कंपनी अखेर ब्लॅक लिस्टेड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या कॉसिस ई-मोबिलिटी प्रा. लि. कंपनीला 'बेस्ट'ने अखेर काळ्या यादीत टाकले आहे. तर २०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करणाऱ्या स्विच मोबिलिटी ऑटोमोटीव्ह कंपनीने आतापर्यंत ५० वातानुकूलित डबलडेकर बसेसचा पुरवठा केला आहे.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या 'बेस्ट' प्रवाशांची दररोजच्या प्रवाशांची संख्या ३२ ते ३५ लाखांवर गेली आहे. 'बेस्ट'च्या ताफ्यात सध्या ३०३८ बस आहेत. यातील अनेक बस त्यांची कालमर्यादा संपल्याने भंगारात जात असतात. यावर्षी किमान ५०० बस बाद होणार आहेत. त्यामुळे बसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

शिवाय 'बेस्ट'च्या धोरणानुसार २०२६ पर्यंत गाड्यांचा एकूण ताफा १० हजार इलेक्ट्रिक बसपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र करार केलेल्या कंपन्या बसपुरवठा करीत नसल्याने 'बेस्ट'च्या पर्यावरणपूरक धोरणाला फटका बसत आहे.

'बेस्ट'च्या ताफ्यात असलेल्या जुन्या डबलडेकर बसेस इतिहासजमा झाल्याने प्रवाशांना डबलडेकर बसेसचा आनंद घेता यावा, यासाठी एसी डबलडेकर बसेस घेण्याचा निर्णय 'बेस्ट'ने घेतला आहे. यासाठी 'बेस्ट'ने टेंडर प्रक्रिया राबवली. टेंडर प्रक्रियेस प्रतिसाद देत स्विच मोबॅलिटी व कॉसिस कंपनीने डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास होकार दिला.

त्यानंतर स्विच मोबॅलिटी कंपनीने टप्प्याटप्प्याने डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत ५० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा केला आहे. मात्र कॉसिस कंपनीकडून ७०० बसेसचा पुरवठा होत नसल्याने अनेकदा स्मरणपत्र पाठवण्यात आली. मात्र काॅसिस कंपनीकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने तत्कालीन महाव्यवस्थापकांनी काळ्या यादीत टाकण्याचा इशारा कॉसिस कंपनीला दिला होता.

तरीही कंपनीने बसेसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर ही अनेकदा कंपनीसोबत चर्चा करत बसेसचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले. मात्र कंपनीने कुठलाच प्रतिसाद न दिल्याने अखेर कॉसिस कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचे 'बेस्ट'कडून सांगण्यात आले.