BEST Bus Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : बेस्टकडून धक्कादायक निर्णय; पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सेवा बंद

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली ओपन डेक बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. तसेच बेस्ट प्रशासनाने ५० नवीन ओपन डेक बस खरेदी करण्यासाठी काढलेले टेंडर सुद्धा रद्द केले आहे.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना झटपट सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहता यावी आणि बेस्टच्या उत्पन्नवाढीसाठी ओपन डेक बस सुरू करण्यात आली होती. बेस्टच्या ओपन डेक बसमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक दोन प्रकार होते. ओपन डेक बसद्वारे पर्यटकांना मुंबईतून पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांची सफर घडवण्यात येत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळे केवळ संध्याकाळीच ओपन डेक बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होती. परंतु ५ ऑक्टोबर नंतर बेस्टच्या ताफ्यातून ओपन डेक बस हद्दपार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई दर्शन बसेस बंद होणार असल्याने पर्यटकांना मोकळ्या बसमधून मुंबईचे दर्शन घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता अन्य प्रकारच्या ओपन डेक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

भारतासह जगभरातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती. अप्पर डेकमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी १५० तर लोअर डेकमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ७५ रुपयांचे शूल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे आता आगामी काळात बेस्टकडून पर्यटकांना मुंबई दर्शनासाठी दुसऱ्या बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.