मुंबई (Mumbai) : 'बेस्ट'ने १५० वातानुकूलित डिझेल बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच हे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने 'बेस्ट'च्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 'बेस्ट'कडे ३,२२८ बसेस असून, २०२६ पर्यंत १० हजार बसेसचा समावेश 'बेस्ट'च्या ताफ्यात होणार आहेत. या १० हजार बसेस पर्यावरणपूरक असतील असे 'बेस्ट'कडून सांगण्यात आले होते. मात्र आता 'बेस्ट'ने डिझेलवर धावणाऱ्या मिनी वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'बेस्ट'ला पर्यावरणाचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
'बेस्ट'च्या ताफ्यात सद्यस्थितीत ३,२२८ बसेस आहेत. यापैकी १,६४६ बसेस 'बेस्ट'च्या मालकीच्या असून १,५८२ बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. यामध्ये डिझेलवर धावणाऱ्या ५७० बसेस असून आणखी १५० वातानुकूलित डिझेलवर धावणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी 'बेस्ट'च्या एका कंत्राटदाराने आपली बस सेवा थांबवली होती. त्याच्याकडील २७५ बसगाड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे बसगाड्याअभावी बेस्टला मुंबई शहर व उपनगरातील अनेक बसमार्ग बंद करावे लागले होते. या नव्या बसगाड्या आल्यानंतर बेस्ट बस ताफ्यातील कमतरता भरून निघेल व प्रवाशांची चांगली सोय होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमातील उच्चपदस्थांनी व्यक्त केला.