मुंबई (Mumbai) : व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँड लिमिटेडला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २,१०४ बसेसचे टेंडर मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एमएसआरटीसी) व्हायकिंग पॅसेंजर बसच्या २,१०४ युनिटचे हे कंत्राट आहे. सुमारे ९८२ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे.
अशोक लेलँडच्या विशेष बस बॉडी प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह या बसेस तयार केल्या जातील. ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२५ या १२ महिन्यांच्या कालावधीत बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. हिंदुजा समूहाच्या या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टेंडर जिंकल्यामुळे बस सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व मजबूत करण्यास मदत होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एमएसआरटीसी) मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. अशोक लेलँडच्या विशेष 'बस बॉडी' प्रकल्पात या 'व्हायकिंग' प्रवासी बसची निर्मिती केली जाणार आहे. अशोक लेलँडचे एमडी आणि सीईओ शेनू अग्रवाल यांनी नवीन करार एमएसआरटीसीसह कंपनीच्या दीर्घकालीन भागीदारीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे.
टेंडर जिंकल्यानंतर अशोक लेलँडच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इंट्राडेमध्ये हा शेअर २ टक्क्यांनी वधारून २२८.५० रुपयांवर व्यवहार करत होता. २०२४ मध्ये आतापर्यंत शेअरच्या किंमतीत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर १२ महिन्यांच्या कालावधीत शेअरमध्ये ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ३० टक्क्यांनी वधारला आहे. ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २४५.६० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १५७.६५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६६,६५६.९० कोटी रुपये आहे. हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी अशोक लेलँडचा निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) जवळपास १७ टक्क्यांनी वाढून ९३३.६९ कोटी रुपये झाला आहे.