mumbai Tendernama
मुंबई

Kalyan-Dombivali : 250 इमारती अतिधोकादायक; प्रशासनाने बजावली नोटीस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) क्षेत्रातील दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या अख्यारित जुन्या व धोकादायक इमारतीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अति धोकादायक ठरल्या गेलेल्या अडीचशे ते तीनशे इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र तरी सुद्धा सोसायटी व इमारतीत वास्तव करणाऱ्यांकडून ऑडिट केले जात नसल्याने पावसाळ्यात दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तीस वर्ष व त्यापेक्षाही जुन्या झालेल्या इमारती कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने उभ्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी ज्यादा नफा कमविण्यासाठी बनावट साहित्य वापरून त्या उभ्या केल्या गेल्या आहेत. इमारतीच्या ताकदीच्या पलीकडे भार टाकून सर्रासपणे मजले वाढविले जात असल्याने इमारतीची ताकद काही काळाने संपुष्टात येते. त्यामुळे अचानक पणे इमारती कोसळून जीवित हानी होत दुर्घटना होण्याचे प्रमाण ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिका क्षेत्रात नियमितपणे घडू लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वच प्रभाग क्षेत्रात धोकादायक इमारतींचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहेत. पालिका प्रशासनाने अति धोकादायक ठरलेल्या इमारती व सोसायटींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस देऊनही इमारतीत राहणाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट न करता धोकादायक इमारतीत जीवावर उदार होत राहत असल्याचे दिसून येत आहे. अति धोकादायक घोषित केलेल्या या इमारतींना नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिली आहे. तीस वर्षाचा कालावधी झालेल्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यासाठी प्रशासन नोटीस देत असते. इमारत किंवा सोसायटीने स्ट्रक्चरल ऑडिट सादर केल्यानंतर सी वन संवर्गात ती मोडत असेल तर ती अति धोकादायक, इमारत सी टू ए मधले असेल तर इमारत खाली करून दुरुस्ती करणे, सी टू बी मधील इमारत असेल तर खाली न करता दुरुस्ती करणे, आणि सी तीन मध्ये येत असेल तर किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी चार कॅटेगिरी प्रामुख्याने प्रशासनाने निर्माण केले आहे. पालिका प्रशासनाने याकरिता 15 स्ट्रक्चरल ऑडिटरची टीम निर्माण केली आहे आणि त्यांच्याकडूनच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे बंधनकारक नियम सोसायटी व इमारती मध्ये वास्तव्य करणाऱ्यांसाठी केली आहे.

2022-23 या कालावधीत अति धोकादायक इमारती काही अंशी तोडल्या गेल्या आहेत, मात्र तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या अति धोकादायक ठरल्या गेलेल्या इमारती मध्ये जीव टांगणीला बांधत हजारोंच्या संख्येतील परिवार कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमध्ये वास्तव करून राहत आहेत. काही दिवसा वर पावसाळा येऊन ठेपला असल्याने अति धोकादायक घोषित केलेल्या संभाव्य इमारती कोसळल्या तर मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता येथे वर्तवली जात आहे. इमारतीला तीस वर्षे झाली असतील तर अशा इमारत धारकांनी व सोसायटीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असल्याचे आवाहन पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी केले आहे.