मुंबई (Mumbai) : मुंबईतील तब्बल १८० बेस्ट बस स्थानकांवर (BEST Bus Stop) चालू महिन्यापासून १ हजार ई-बाईक (E-Bike) तैनात करण्यात येणार आहेत. जून २०२३ पर्यंत या ई बाईकचा ताफा एक हजारांवरून पाच हजार इतका करण्यात येणार आहे. 'वोगो' या दुचाकी वाहन देणाऱ्या संस्थेसोबत भागीदारी तत्वावर ही सेवा बेस्टकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Get off the BEST bus and go straight home by e-bike)
संपूर्ण शहरातील पहिला आणि शेवटचा टप्पा जोडण्याच्या उद्देशानेच ई बाईक सेवा सुरू करण्यात आली आहे. या महिन्यापासून ही ई बाईकची सेवा सुरू होणार आहे. बसमधून उतरणारे प्रवासी हे त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी ई बाईकचा वापर करू शकतात. या ई बाईक स्टेशनवर वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. बेस्टने जून २०२२ पासून ई बाईक सेवेची चाचपणी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी या ई बाईकच्या चाचणीसाठी ४० हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. सुरूवातीला या ई बाईक्स अंधेरी, विलेपार्ल, जुहू, सांताक्रुझ, खार, वांद्रे, माहीम आणि दादर याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर शहराच्या उर्वरीत भागात या बाईकचा विस्तार करण्यात येणार आहे. जून २०२३ पर्यंत या ई बाईकचा ताफा एक हजारांवरून पाच हजार इतका करण्यात येणार आहे. लवकरच ही सेवा बेस्ट चलो अॅपसोबतही संलग्न करण्यात येणार आहे.
बेस्टनेही प्रवासाचे विशेष नियोजन करत बसेस आणि ई बाईकवरील फेऱ्या एकाच योजनेत समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळेच बस प्रवासी संख्या वाढीसाठीही मदत होईल, असा बेस्टचा विश्वास आहे. वोगो या दुचाकी वाहन देणाऱ्या संस्थेसोबत भागिदारी तत्वावर ही सेवा बेस्टकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ई बाईकची सेवा देणारा बेस्ट वाहतूक हा पहिला सार्वजनिक वाहतूक उपक्रम ठरणार आहे.