Maharashtra Budget Session 2024 मुंबई : संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग येत असताना लघु उद्योजकांकडे दुर्लक्ष केले जातेय. त्यामुळे त्यांची होणारी कुचंबणा थांबण्यासाठी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार धोरण बदलणार का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज सभागृहात उपस्थित केला.
संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये औद्योगिक पट्ट्या अंतर्गत १० हजार एकर औद्योगिक भूखंड आहे. या भागात अनेक मोठं मोठे उद्योग आले आहेत मात्र १० हजार क्षेत्रफळाचा भूखंड असताना मोठ्या उद्योगांचा अभाव येते असल्याचे दानवे यांनी म्हटले. या भागात पंचतारांकित इंडस्ट्रीसाठी पायाभूत सुविधा असताना येथे मोठ्या उद्योगांची स्थापना होत नाही. मराठवाड्यात आणि संभाजी नगरमध्ये स्थानिक उद्योग मोठ्या प्रमाणात होत असताना या भागात मध्यम स्वरूपाच्या स्थानिक उद्योगांना स्थान नाही.
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाने औद्योगिक संघटनांना सोबत घेऊन लघुउद्योजक स्टार्ट्अप स्पेशल झोन म्हणून या भागातील लघु उद्योजकांना संधी देणार का, असा सवालही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. संभाजी नगर मधील मॅझिक नावाच्या संस्थेने या भागात स्टार्टअपसाठी सुविधा आणि प्लॉट द्याव्यात, अशी मागणी देखील केली होती.
संभाजीनगर येथे मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील तांत्रिक शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी राहतात. त्यांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, बंगळूर येथे जावे लागते, याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
संभाजीनगरधील चिखलठाणा, बिडकीन वाळूज, शेंद्रा आणि चितेगाव या पाच औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा पंचतारांकित कॉरिडॉरच्या रस्त्याचा प्रस्ताव गेले १० वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार असा सवालही दानवे यांनी सरकारला विचारला.
यावर महिन्या भरात या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली. गेल इंडिया कंपनी रत्नागिरी आणि संभाजीनगरमध्ये येण्यास इच्छुक होती मात्र ती परराज्यात गेली. त्यामुळे याबाबत येणाऱ्या काळात कार्यवाही करणार का, असा सवाल दानवे यांनी विचारला.