मुंबई (Mumbai) : कोविडनंतर देशात महागड्या लक्झरी घरांना मागणी वाढत चालली आहे. विशेषतः मुंबई महापालिका (एमएमआर), राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (दिल्ली-एनसीआर), बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि कोलकाता या ७ शहरांमध्ये चालू वर्षी २०२४ मध्ये सरासरी घर खरेदीची किंमत १.२३ कोटी रुपयांवर गेली आहे, गेल्यावर्षी सरासरी घर खरेदीची किंमत १ कोटी रुपये इतकी होती.
एप्रिल-सप्टेंबर २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत देशात सर्वाधिक ७७,७३५ घरे मुंबई महानगर प्रदेशात तर त्यापाठोपाठ ४०,१९० इतकी घरे पुण्यात विकली गेली आहेत. याद्वारे मुंबई महानगरात १,१४,५२९ कोटींचे आणि पुणे येथे ३४,०३३ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. भारतातील या प्रमुख ७ शहरांमध्ये सामान्य माणसाला घर खरेदी करणे अवघड होत चालले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२४) या ७ शहरांमध्ये सरासरी घर खरेदीची किंमत १.२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही किंमत २०२३ च्या याच कालावधीच्या तुलनेत २३% जास्त आहे. २०२३ मध्ये सरासरी घर खरेदीची किंमत १ कोटी रुपये होती, असे रियल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी अनारॉकच्या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीनंतर महागड्या घरांना मागणी वाढत आहे. या ७ शहरांमध्ये महागडी घरे आणि नवीन प्रकल्प सुरू झाले आहेत. २०२४ मध्ये या ७ शहरांमध्ये सरासरी घर खरेदीची किंमत १.२३ कोटी रुपये आहे, जी मागील वर्षी १ कोटी रुपये होती.
एनसीआरमध्ये सरासरी घर खरेदीच्या किमतीत ५६% वाढ झाली आहे. मागील वर्षी ९३ लाख रुपये असलेली किंमत आता १.४५ कोटी रुपये झाली आहे. या आर्थिक वर्षात ४६,६११ कोटी रुपये किमतीची ३२,१२० घरे विकली गेली. मागील वर्षी ३०,१५४ कोटी रुपये किमतीची ३२,३१५ घरे विकली गेली होती. विक्रीच्या मूल्यात ५५% वाढ झाली असली तरी, विक्री झालेल्या घरांच्या संख्येत १% घट झाली आहे. मुंबई महानगरात सरासरी किमतीत कोणताही बदल झालेला नाही. येथे सरासरी घर खरेदीची किंमत १.४७ कोटी रुपये आहे. मागील वर्षी १,१२,३५६ कोटी रुपये किमतीची ७६,४१० घरे विकली गेली होती, तर या वर्षी १,१४,५२९ कोटी रुपये किमतीची ७७,७३५ घरे विकली गेली आहेत. बेंगळुरूमध्ये मागील वर्षी २६,२७४ कोटी रुपये किमतीची ३१,४४० घरे विकली गेली होती, तर या वर्षी ३७,८६३ कोटी रुपये किमतीची ३१,३८० घरे विकली गेली आहेत.
अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, "एप्रिल आणि सप्टेंबर २०२४ दरम्यान, ७ प्रमुख शहरांमध्ये २,७९,३०९ कोटी रुपये किमतीची २,२७,४०० घरे विकली गेली. २०२३ च्या याच कालावधीत २,३५,२०० घरे विकली गेली होती, ज्यांची किंमत २,३५,८०० कोटी रुपये होती. विक्री झालेल्या घरांच्या संख्येत ३% घट झाली असली तरी, एकूण विक्रीच्या मूल्यात १८% वाढ झाली आहे. हे महागड्या घरांना असलेल्या मागणीचे द्योतक आहे." एप्रिल-सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबई महानगरात सर्वाधिक ७७,७३५ घरे विकली गेली, त्यानंतर पुणे (४०,१९०), एनसीआर (३२,१२५), बेंगळुरू (३१,३८०) आणि हैदराबाद (२७,८२०) या शहरांचा क्रमांक लागतो. मूल्यानुसार, मुंबई महानगरात १,१४,५२९ कोटी रुपयांची घरे विकली गेली, त्यानंतर एनसीआर (४६,६११ कोटी रुपये), बेंगळुरू (३७,८६३ कोटी रुपये), पुणे (३४,०३३ कोटी रुपये) आणि हैदराबाद (३१,९९३ कोटी रुपये) या शहरांचा क्रमांक लागतो.