BMC Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिकेच्या 'त्या' जलबोगद्याच्या टेंडरमध्ये 'ऍफकॉन्स'ची बाजी; 2896 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भातसा धरणातून मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलबोगदा बांधला जाणार असून बलाढ्य 'ऍपकॉन्स इन्स्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' कंपनीला हे टेंडर मिळाले आहे. तब्बल ५८ टक्के बिलो किंमत भरून कंपनीने हे टेंडर मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील 'लार्सन अँड टुब्रो कंपनी'ने साडेतीन टक्के अधिकचा दर आकारला होता. या कामावर सुमारे २८९६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा जलबोगदा कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत बांधण्यात येणार आहे.

'ऍफकॉन्स'ने मुंबई मेट्रो रिजन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबईमधील मेट्रो लाईन ४ व ५ चे काम केले आहे तसेच कोलकाता मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या प्रत्येकी ३.८ मी व्यासाच्या जुळ्या बोगद्यांचे बांधकाम केले आहे, या प्रकल्पात हुगळी नदीच्या खालून ५.५५ मीटर संपूर्ण व्यासाच्या बोगद्याचे काम केल्याची नोंद आहे. मुंबई महापालिकेच्या बॉम्बे २ आणि बॉम्बे ३ या दोन मुख्य जलवाहिन्या भातसा या धरणातून मुंबई शहरापर्यंत पाणी वाहून आणतात. या जलवाहिन्या कशेळी खाडीजवळ ठाणे शहरात प्रवेश करतात आणि पुढे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस माजीवडे येथे भूमिगत होऊन पुढे मुलुंड जकात नाक्याजवळ हरी ओम नगर येथे मुंबई शहरामध्ये प्रवेश करतात.

गेल्या काही दशकांमध्ये ठाणे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ठाणे शहरामधील विविध विकास कामांना जलवाहिन्यांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून या दोन्ही जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याची विनंती केली आहे. त्यानुसार अपेक्षित वाढीव पाणी पुरवठ्याचा अभ्यास करून दोन्ही जलवाहिन्यांचे पाणी एक नवीन जल बोगदा बांधून त्यामध्ये वळवण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने ठाणे शहर परिसरात बाळकुम ते मुलुंड नाक्यापर्यंत जल बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा बोगदा कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत बांधण्याचे नियोजित करण्यात आले आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन या जलबोगद्यातून २४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा जलअभियंता खात्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सल्लागार टीसीई यांनी आपला अहवाल सादर केला. यात सल्लागार टीसीई कंपनीने २४०० दशलक्ष लिटर पाणी वाहून नेण्याच्या या संपूर्ण बोगद्याचा साडेचार मीटर व्यास निश्चित केला आहे. या जलबोगद्यामुळे योग्यदाबाने पाण्याचा पुरवठा होईल आणि याद्वारे सर्वांत दूरपर्यंत आणि सर्वांत उंच भागापर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.