मुंबई (Mumbai) : स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात चांगले काम झाले. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारकडून प्रत्येक कामात घोटाळे आणि वारेमाप खर्च करून केवळ कंत्राटदारांच्या बँक खात्यांचे सुशोभीकरण केले जात असल्याची टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
माहीम किल्ल्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर सडकून टीका केली. फुटपाथपासून बसस्टॉपपर्यंत जे काही सौंदर्यीकरणाचे काम आम्ही केले त्यात कमीत कमी खर्च कसा होईल, याकडे लक्ष दिले. मात्र आता प्रत्येक कामात जास्तीत जास्त खर्च कसा होईल याकडे भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.
रस्त्याचा घोटाळा, खडीचा घोटाळा आणि आता सौंदर्यीकरणाच्या कामातही घोटाळा होत असल्याचे त्यांनी सांगितले. घटनाबाह्य सरकारचा एकच हेतू आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या बँक खात्याचे सुशोभीकरण कसे होईल! बाकी कुणाचेही काही होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तामिळनाडूत गेलेल्या पुमाच्या प्रोजेक्टवरूनही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला खडे बोल सुनावले. काल-परवा बातमी पाहिली की, आपल्याकडे जी चपला बनवणारी कंपनी येणार होती ती तामिळनाडूत गेली. ही कंपनी जशी गेली तशी गेल्या नऊ महिन्यांत अनेक कंपन्या दुसऱ्या राज्यात गेल्या. त्या त्या राज्यातील निवडणुकांसाठी तिथे या कंपन्या पळवल्या जात आहेत.
त्याचवेळी ज्या प्रकल्पांना तिकडे विरोध होतो, असे प्रकल्प आपल्या लोकांवर लादले जात आहेत. आजचे हे चित्र भयानक आहे. महिलांवर लाठीचार्ज होतो, त्रास दिला जातो. हा प्रकल्प का येतोय ते लोकांना समजावून सांगा. तुमचा प्रकल्पच असा आहे की तो लोकांना समजावून सांगता येऊ शकत नाही, अशा शब्दांत आदित्य यांनी शिंदे सरकारला फटकारले.