Mumbai News मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील १४३ एकर जागेत मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकासाच्या टेंडरसाठी (Tender) अदानी समुह (Adani Group) आणि एल अँड टी समुहात (L&T Group) स्पर्धा आहे. सध्या पुनर्विकासाचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरच कमर्शियल टेंडर खुले करून पुनर्विकासाचे कंत्राट दोन्हीपैकी एका कंपनीस दिले जाणार आहे.
गोरेगाव पश्चिम येथील १४३ एकर जागेत मोतीलाल नगर वसाहत उभी आहे. मोतीलाल नगर १, २ आणि ३ या नावाने असलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून 'कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी'अंतर्गत (सी अँड डी) केला जाणार आहे. मात्र मोतीलाल नगर पुनर्विकासाचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मोतीलाल नगरचा पुनर्विकास अद्यापही मार्गी लागलेला नाही.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने या पुनर्विकास प्रकल्पासाठी बांधकामाचे टेंडर काढले असून टेक्निकल टेंडर खुले केले आहे. यात अदानी समुह आणि एल अँड टी समुहाचे टेंडर पात्र ठरले आहे. मात्र पुनर्विकासाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरच कमर्शियल टेंडर खुले करून पुनर्विकासाचे कंत्राट दिले जाणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोतीलाल नगरचा ड्रोनने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. १० मे रोजी ड्रोन सर्वेक्षणासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरनुसार मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या अभिन्यासाचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत अभिन्यासात काय बदल झाले आहेत, अतिक्रमणे वाढली आहेत का यासह अन्य काही बाबींची माहिती या ड्रोन सर्वेक्षणाअंतर्गत घेण्यात येणार आहे.
यासाठी मंडळाकडून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवारी असून त्याच दिवशी सायंकाळी टेंडर खुले केले जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येईल.