मुंबई (Mumbai) : अंधेरी कामगार रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पाच वर्षानंतरही पूर्णपणे सुरू झालेली नाही. आजही शस्त्रक्रिया व आंतर रुग्ण विभाग याकरिता विमाधारकांना कांदिवली रुग्णालय गाठावे लागत आहे.
सिटीस्कॅन, एम आर आय, 2D इको यासारख्या चाचण्या व रक्तपेढी सारख्या सुविधा ज्या 2018 पूर्वी येथे उपलब्ध होत्या त्या देखील येथे लवकर सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. रुग्णालय कर्मचारी यांचीदेखील मागील काही वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे येथील रुग्ण सेवेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. भाजप सरकारच्या वेळकाढूपणामुळे रुग्णांना आणि विमाधारकांचे उपचार राम भरोसेच आहेत, असा संताप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरीतील कामगार रुग्णालय पूर्ववत सुरु होण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय, राज्य सरकार व कर्मचारी विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली व लवकरच हे रुग्णालय पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले होते, या घटनेलाही एक वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला पण काहीच प्रगती झालेली दिसत नाही.
केंद्रीय कामगार मंत्री, राज्य सरकार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक, विभागीय संचालक हे झोपा काढत आहेत का? असा सवाल कामगार विचारत आहेत. सरकारला ही मोक्याची जागा लाडका उद्योगपती मित्र अदानीला द्यायची असल्यानेच रुग्णालय सुरु केले जात नाही, असा गंभीर आरोप राजेश शर्मा यांनी केला आहे.
अंधेरी कामगार रुग्णालयाला डिसेंबर 2018 मध्ये लागलेल्या आगीनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. १४ ऑगस्ट २०२३ रोजी गरीब कामगारांचे लाखो रुपये खर्च करुन उद्घाटन करण्यात आले तसेच सहा महिन्यांत आंतररुग्ण विभाग सुद्धा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती, परंतु एक वर्ष उलटून गेल्यानंतरही अजून येथील परिस्थिती जैसे थेच आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात रुग्णालयात गळती होऊन पाणी साचल्याने रुग्णालयातील विद्युत पुरवठा २४ तास ठप्प झाला होता. करोडो रुपये खर्चून जर हीच परिस्थिती असेल तर ह्याला नेमके जबाबदार कोण? असे प्रश्न विमाधारक विचारत आहेत, असेही राजेश शर्मा म्हणाले.