मुंबई (Mumbai) : दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याची तब्बल 400 कोटींना विक्री झाली आहे. या पॉश परिसरातील तब्बल 73 वर्षे जुन्या डोळे दिपवून टाकणाऱ्या बंगल्याची खरेदी एका रियल इस्टेट कंपनीने केली आहे. या बंगल्याच्या जागेवर तब्बल 22 मजली टॉवर बांधण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे बंगले याच जुहू परिसरात आहेत. देव आनंद यांच्या निधनानंतर या बंगल्यात कुणीच राहात नव्हते. त्यांची मुले आणि पत्नी मुंबईबाहेर विविध शहरांत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे बंगल्याची देखभाल करण्यासाठी कुणीच नव्हते. अखेर त्यांचा मुलगा सुनील आनंद आणि मुलगी देविना यांनी या बंगल्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. देव आनंद यांनी 1950 साली जुहूमध्ये हा बंगला बांधला होता. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी येथे बंगला बांधण्यामागचे कारण सांगितले होते. त्यावेळी जुहू एक छोटेसे गाव होते. आजूबाजूला फक्त झाडी होती. तिथला एकांत आवडलेला, असे देव आनंद यांनी सांगितले होते. देव आनंद हे पत्नी आणि मुलांसोबत 40 वर्षे या बंगल्यात राहिले. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हापासून हा बंगला रिकामा होता.
देव आनंद यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्यांची पत्नी कल्पना मुलगी देविनासोबत उटीमध्ये राहते. देव आनंद कुटुंबियांनी पनवेलमधील काही जागाही विकल्या असून मिळालेली रक्कम कुटुंबातील तीन सदस्यांमध्ये वाटण्यात आल्याचे कळते. 3 डिसेंबर 2011 मध्ये देव आनंद यांनी लंडनमध्ये असताना अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी ते 88 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. देव आनंद यांनी शेवटपर्यंत काम करणे सोडले नाही. 30 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचा 'चार्जशीट' हा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता.